सणसवाडीच्या अंगणवाडीतील धान्यासह गॅसच्या टाक्या चोरी

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील अंबिका नगर मध्ये असलेल्या अंगणवाडीच्या शालेय बालकांसाठी असलेले पोषण आहाराचे धान्य, तेल तसेच गॅसच्या टाक्या चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील अंबिकानगर मधील अंगणवाडीच्या बालकांसाठी पंचायत समितीच्या ,महिला बाल कल्याण विभागाचे माध्यमातून पोषण आहार दिला जात असल्याने सदर अंगणवाडी मध्ये 50 दिवसांसाठीच्या पोषण आहाराचे हरबरा पोते, साखरेची पिशवी, तेल पिशव्यांचे चार बॉक्स तसेच गॅसच्या 2 टाक्या ठेवलेल्या होत्या.10 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी सेविका सुवर्णा हरगुडे व अरुणा इंगळे या सकाळच्या सुमारास अंगणवाडी उघडण्यासाठी आल्या असताना त्यांना किचन रुमच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता एक हरबरा पोते, एक साखरेचे पोते, तेल पिशव्यांचे चार बॉक्स तसेच गॅसच्या 2 टाक्या चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत अंगणवाडी सेविका सुवर्णा काळूराम हरगुडे (वय ५०) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.