गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह एकजण अटकेत; शिरूर पोलीसांची धडक कारवाई

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील रामलींग परिसरात गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अचूक सापळा रचून अटक केली. सदर कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात शिरूर पोलिसांनी उचललेले पाऊल उल्लेखनीय ठरत आहे.

दि.१५ जून २०२५ रोजी पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे रामलींग येथील रूद्र टाईल्स दुकानाच्या शेजारी एक इसम गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे. ही माहिती पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक गठीत करून कारवाईचे आदेश दिले.

पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन खात्री करत प्रदीप श्रीकिसन तिवारी (वय ४२, रा. साईनगर, बी जे हाउसींग सोसायटी, शिरूर) याला शिताफीने अटक केली. तपासादरम्यान त्याच्याकडून गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४१७/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ जून २०२५ रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास १८ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोसई शुभम चव्हाण, पो.ह. नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पो.अं. विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांनी परिश्रम घेतले.

शिरूर पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई नागरिकांत पोलीस दलाबद्दल विश्वास निर्माण करणारी ठरली आहे. अवैध शस्त्रसाठ्याविरोधात पोलिसांचा हा कडक दृष्टीकोन भविष्यातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यास मदत करणारा ठरेल.