पुणे: पुणे शहरात देहव्यापार करणाऱ्या स्पा सेंटर आणि लॉजवर अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाने मोठी कारवाई करत सहा महिलांची सुटका केली आहे. विशालनगर, निगडी आणि आळंदी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून संबंधित स्पा व लॉज चालकांवर पीटा (अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशालनगर येथील इंटर्नल फॅमिली स्पा येथे वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री सुमारे १० वाजता छापा टाकण्यात आला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात स्पा संचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्पाचा मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसैन कलाम याला अटक करण्यात आली आहे.
तसेच निगडी येथील ईगल स्पा येथे पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे.याशिवाय आळंदी येथील योगीराज लॉज आणि कृष्णा लॉज येथेही पोलिसांनी कारवाई करत प्रत्येकी एका महिलेची सुटका केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात शहरातील तीन स्पा सेंटरवर बंदी घालण्यात आली आहे. तर सन २०२५ च्या मध्यापर्यंत एकूण २५ स्पा सेंटरवर कारवाई, ४५ आरोपींना अटक आणि ६३ महिलांची सुटका करण्यात आली आहे.शहरात बेकायदेशीर देहव्यापाराविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून संशयित स्पा व लॉजवर कठोर नजर ठेवली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.