देहुरोड: देहुरोड परिसरात विनानंबर प्लेटची मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणाला अडविल्यानंतर वाहनचोरीच्या मोठ्या मालिकेचा पर्दाफाश झाला आहे. देहुरोड पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करत एकूण ६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, ५ मोटारसायकली व १ रिक्षा असा सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहर व उपनगरात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ईश्वर संदीप गजे (वय २२, रा. खालुंब्रे, ता. खेड; मुळ रा. शिवाजीनगर बसस्टँड मागे, अकोले, जि. अहिल्यानगर), अनिकेत ऊर्फ संतोष विटकर (वय २०, रा. देहुगाव) आणि आर्यन ऊर्फ एस. पी. आनंदा राऊत (वय १९, रा. भारतमाता चौक, मोशी) यांचा समावेश आहे.
पोलिस नोंदीनुसार अनिकेत विटकर याच्याविरोधात २०२४ मध्ये खुनाचा प्रयत्न आणि २०२५ मध्ये दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आर्यन राऊत याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल आहे.
दि. २७ जानेवारी रोजी देहुगाव परिसरात पोलिस पेट्रोलिंग करत असताना परंडवाल चौकाकडून पेट्रोल पंपाच्या दिशेने विनानंबर प्लेटची मोटारसायकल जात असल्याची माहिती मिळाली. संशयावरून पोलिसांनी ईश्वर गजे याला अडवून चौकशी केली असता त्याच्याकडील मोटारसायकल देहुरोड परिसरातून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
पुढील चौकशीत ईश्वर गजे याने अनिकेत विटकर आणि आर्यन राऊत यांच्यासह वाहनचोरी करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या सांगण्यावरून आणखी ४ मोटारसायकली आणि १ रिक्षा जप्त केली.
तपासात खडक व सिंहगड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक, तर दिघी व देहुरोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन असे एकूण ६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. एका मोटारसायकलीबाबतचा तपास अद्याप सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई देहुरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, इतर फरार वाहनचोरांवरही पोलिसांचे लक्ष केंद्रित आहे. नागरिकांनी विनानंबर प्लेटची वाहने किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.