कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एमआयसीसी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) हद्दीतील गणेगाव खालसा, ता. शिरुर, जि.पुणे येथे दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ऊस तोडणी करिता आलेला कामगार माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे (रा. दडपिंपरी,ता. चाळीसगाव जि. जळगाव) यांनी त्याची पत्नी मिनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय २७) हिचा नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन तिला रस्सीने लोखंडी बाजेला बांधुन गळा आवळून तिला जीवे ठार मारुन खून केला होता.
त्यावरुन मयताचा भाऊ ताराचंद सुखलाल मोरे (रा. गणेगाव खालसा,ता शिरुर, जि. पुणे, मुळ रा. सिध्दवाडी ता. चाळीसगाव, जि.जळगाव याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची फिर्याद होती. खून केल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरुन फरार झाला होता. आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान रांजणगाव एमआयडीसी पोलीस समोर होते.
सदरचा प्रकार हा गंभीर असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याकरीता सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ तीन वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना आरोपीचा शोध घेणे बाबत सूचना दिल्या होत्या.
वरील पथकांनी सदर आरोपीचा मलठण, पिंपरी दुमाला तसेच परीसरातील साखर कारखाने, तसेच कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांकडे शोध घेतला. तसेच संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा जि. अहिल्यानगर येथे जाऊन पोलीस पथकाने तेथील ऊस तोडणी कामगारांचेकडे, हॉटेल व्यवसायिकांकडे व काही शेतकऱ्यांकडे आरोपीचा शोध घेतला. परंतु आरोपी मिळून येत नव्हता. त्यानंतर पोलीस पथकांनी सदर आरोपीचा शोध हा पाचोरा, जि.जळगाव तसेच आरोपीचे मुळ गावी दडपिंपरी ता. चाळीसगाव जि. जळगाव येथे जाऊन शोध घेतला. परंतु तरीही कोणतेच धागेदोरे पोलीसांच्या हाती लागत नव्हते. तसेच दौंड व यवत भागातील उसाच्या गुऱ्हाळावर जाऊन तेथील उसतोड कामगांराकडे आरोपीचा शोध घेतला. परंतु आरोपी मिळुन आला नव्हता.
सदर आरोपीचा शोध सुरु असताना दि १२ मार्च २०२५ रोजी पोलिसांना सदर आरोपी हा त्याचे मुळगावी दडपिपंरी, ता.चाळीसगाव, जि.जळगाव येथे येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी, पोलिस कॉन्स्टेबल प्रविण पिठले, योगेश गुंड यांचे एक पथक त्याचे मुळगावी पाठवले, पोलीस सदर आरोपीच्या गावात वेशांतर करुन सापळा लावुन बसलेले असताना आरोपी लपतछपत त्याच्या गावात येत असताना पोलिसांनी त्याला शिताफिने तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.
सदरचा आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे हा गुन्हा केल्यापासून फरार होता तो मोबाईल वापरत नसल्याने त्याला अटक करण्याचे पोलीसांना आव्हान होते. परंतु पोलीसांना आरोपीला पकडण्यात यश आले. सदर आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस ६ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे.या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, संतोष औटी, संदिप जगदाळे, विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल योगेश गुंड, उमेश कुतवळ, प्रविण पिठले, किशोर शिवणकर यांच्या पथकाने केली आहे.
रांजणगाव गणपती येथे एकाच जमिनीची दोनदा विक्री; दिपक पंचमुख यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल
शिरुर तालुक्यातील भुमाफिया बंटी-बबलीचा कारनामा; दोन उद्योजकांना घातला करोडोंचा गंडा
शिरुरसह श्रीगोंदा तालुका हादरला…शिरुर-श्रीगोंदा शिवेवर तरुणाचा निर्घुण खून
कौतुकास्पद; शिरुर पोलिसांची दारुवर मोठी कारवाई दारुसह ७५ लाखांचा ऐवज केला जप्त
रांजणगाव पोलिसांनी कारेगावातील कोयता गँगच्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या