रांजणगाव गणपती (तेजस फडके): दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 तसेच आगामी महत्त्वाचे सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रांजणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत रुट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च रांजणगाव गणपती गावातील एस टी स्टँड चौक, भांबर्डे करंजावणे रोड, ग्रामपंचायत चौक, हनुमान मंदिर, रांजणगाव गणपती मंदिर रोड या संवेदनशील व वर्दळीच्या भागातून काढण्यात आला. या मार्गावरुन काढलेल्या रुट मार्चमुळे परिसरात पोलिसांची प्रभावी उपस्थिती दिसून आली.
या रुट मार्च दरम्यान पोलिसांनी नागरिकांशी थेट संवाद साधत शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले. निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या अफवा, गैरप्रकार किंवा कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत, तसेच पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
हा रुट मार्च शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिरुर, शिक्रापुर तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन येथील मिळून १ पोलीस निरीक्षक, १० सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक तसेच ५० पोलीस अंमलदार यामध्ये सहभागी झाले होते. या रुट मार्चमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक व सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.