रांजणगाव MIDC पोलीसांनी मोबाईल चोरी प्रकरणी टिकटॉक स्टारला ठोकल्या बेड्या

क्राईम

रांजणगाव गणपती (तेजस फडके): सोशल मिडीयावरती रिल्स व टिकटॉक व्हिडीओ बनविण्याचा छंद असल्याने एका युवकाला फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी चांगल्या दर्जाच्या मोबाईलची आवश्यकता होती. त्याचे इंन्टाग्राम अकाऊंटवरती वेगवेगळे व्हिडीओ, रिल्स असुन त्याचे 50,000 पेक्षा जास्त फॉलोर्स आहेत.त्यामुळे नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याला आर्थिक अडचण असल्याने त्याने मोबाईल चोरी केली. पण पोलिसांनी CCTV फुटेज चेक केलं आणि तो सापडला.

रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय कांतीलाल बो-हाडे सध्या रा. रांजणगाव गणपती, संकल्पसिटी, मुळ रा. शिरुर, शांतीनगर, ता शिरुर, जि पुणे याने रील बनविण्यासाठी घरातुन मोबाईल चोरी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. रांजणगाव गणपती येथील अमर धनराज इडेमल यांचा दि. 19 मे 2022 रोजी राहत्या घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने वन प्लस कंपनीचा मोबाईल चोरी केला होता.याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषन करुन तसेच CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता सदरचा मोबाईल फोन हा आरोपी आरोपी संजय बो-हाडे याने चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी या गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपीस अटक करुन त्याच्याकडुन चोरीस गेलेला वन प्लस कंपनीचा मोबाईल जप्त करुन आरोपीस शिरुर येथे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला मंगळवार (दि. 11) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर, वैभव मोरे यांनी केली असुन या गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.