मंचर: मंचर शहरात शनिवारी (दि. २) रोजी रात्री 10 च्या सुमारास भरचौकात घडलेल्या एका खळबळजनक घटनेत प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५), रा. एस कॉर्नर, मंचर या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. घटनेनंतर अवघ्या एक तासात पोलिसांनी खुनातील तिघा आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे.
सदर घटना नंदिनी बिअर बारसमोर घडली. शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे, प्रतिक शिवाजी इंदोरे (सर्व रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव) या तिघांशी प्रशांत गांजाळे यांचा काही कारणावरून वाद झाला. वादाच्या दरम्यान शहाजी इंदोरे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने गांजाळे यांच्या गळ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गांजाळे जागीच कोसळले. त्यांना तत्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर मंचर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घबरून दुकानांचे शटर खाली केले. रुग्णालयासह घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी अवघ्या एका तासात अवसरी परिसरातून तीनही आरोपींना ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, यशवंत यादव, राजेश नलावडे, गणपत डावखर, पोलीस हवालदार नंदकुमार आढारी, संजय नाडेकर, सुदाम घोडे, तान्हाजी हगवणे, योगेश रोडे, अविनाश दळवी व हनुमंत ढोबळे यांच्या संघाने केली.
दरम्यान घोडेगाव न्यायालयाने तीन आरोपींना शुक्रवार (ता.८) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहेत.