शिरुर तालुक्यात दाम्पत्याला मारहाण करत पोकलेनने घर भुईसपाट

क्राईम

न्यायालयाचे आदेश मोडीत काढत नुकसान केल्याचे चौघांवर गुन्हे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे न्यायालयाने जागेबाबत मनाई आदेश दिलेले असताना देखील चौघांनी दाम्पत्याला मारहाण करत घराबाहेर काढून २ पोकलेनच्या सहाय्याने घर भुईसपाट केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रसाद कैलास धुमाळ, सुमन दत्तात्रय शिंदे, जितेंद्र दत्तात्रय शिंदे, प्रमिला उर्फ बायडी पाचर्णे या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील निवृत्ती काळोखे यांनी २००३ साली सुमन शिंदे यांच्याकडून पुनर्वसन गावठाण येथील जमीन नवीन शर्त कमी झाल्यानंतर खरेदी खत करण्याचे ठरवत ताबा साठेखत करुन घेतली होतीसदर जमिनीत काळोखे यांनी घर व पाच खोल्या बांधून तेथे राहत होते. याबाबत ग्रामपंचायत नोंद असून त्याचा कर देखील रीतसर भरला आहे. परंतु सुमन शिंदे या जमिनीचे खरेदीखत करुन देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे काळोखे यांनी पुणे न्यायालयात दावा दाखल केला असताना परंतु २६ जून २०२२ रोजी सुमन शिंदे यांनी सदर जमिनीचे प्रसाद धुमाळ यास खरेदीखत करुन दिले. त्यांनतर पुन्हा काळोखे यांनी दावा दाखल केल्याने न्यायालयाने सदर जमिनीबाबत मनाई आदेश जारी केले.

दरम्यान ८ ऑगस्ट २०२२ रोजी काळोखे हे त्यांच्या पत्नीसह घरी असताना प्रसाद धुमाळ हा दोन पोकलेन घेऊन घरासमोर आला आणि काळोखे यांना शिवीगाळ, दमदाटी करत घराबाहेर निघा मला घर पाडायचे आहे, असे म्हणू लागला. यावेळी काळोखे यांनी न्यायालयाचे आदेश आहेत, असे म्हटले असताना देखील प्रसाद धुमाळ, सुमन शिंदे यांसह आदींनी काळोखे यांच्या सह त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की करत घराबाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत काळोखे यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील पडून गहाळ झाले. दरम्यान मारहाण करत असताना पुन्हा येथे आलास तर तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली

याबाबत तक्रार देण्यासाठी निवृत्ती काळोखे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आलेले असताना धुमाळ व शिंदे यांनी काळोखे यांचे घर २ पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. याबाबत निवृत्ती नारायण काळोखे (वय ५६) रा. पुनर्वसन गावठाण शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रसाद कैलास धुमाळ रा. पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) जि. पुणे, सुमन दत्तात्रय शिंदे, जितेंद्र दत्तात्रय शिंदे दोघे रा. वाडा ता. खेड जि. पुणे, प्रमिला उर्फ बायडी पाचर्णे रा. खेड ता. खेड जि. पुणे या चौघांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे हे करत आहे.