शिरुर; घोडनदी पात्रात रस्सीने बांधलेला अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहराजवळून वाहणाऱ्या घोडनदी पात्रात पाचर्णे मळा येथे एक अनोळखी पुरुषाचे पाण्यावर तरंगत असलेले प्रेत रस्सीने बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात असून हा खुन की आणखी काही वेगळे आहे. तसेच हा मृतदेह कुणाचा…? याचा उलगडा करण्याचे शिरुर पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असुन या अज्ञात मृतदेहाबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये हिंगणी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील पोलिस पाटील लक्ष्मण महादु वाखारे यांनी फिर्याद दिली आहे.

आज (दि 31) रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शिरुर येथील पाचर्णेमळ्याच्या हद्दीत घोडनदी पात्रात रामभाऊ पाचर्णे यांच्या शेतास लागुन एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत असलेले दिसले. पोलिस पाटिल लक्ष्मण वाखारे यांनी पोलीसांना सदर घटनेची माहीती दिल्यानंतर शिरुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरीकांची मदत घेउन बोटीच्या साहयाने मयत व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला.

हा मृतदेह पुरुष जातीचा असुन वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, रंग सावळा, दाढी मिशा राखलेली, डोक्यास काळे कुरळे केस, उंची ६ फुट अंदाजे, बांधा मध्यम, नेसनीस पोपटी रंगाचा त्यावर लाईनिंगचा फुलबाह्याचा शर्ट, काळया रंगाची जिन्स पॅन्ट तिच्या मागील खिश्याजवळ ” D69J ANS” असा मार्क असलेली, पॅन्टच्या खिश्यामध्ये दोन मोटार सायकलच्या चाव्या असुन मयताच्या डाव्या हाताच्या अंगठयावर ” M” असे गोंदण आहे. तसेच सदरचा मृतदेह दंडापासून ते पायापर्यंत काळया, लाल व पांढऱ्या रंगाच्या दोरीने पुर्णपणे बांधलेला आहे.

 

त्यामुळे वरील वर्णनाचा इसम ओळखीचा वाटल्यास नागरीकांनी तात्काळ शिरुर पोलिस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप यादव आणि पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऊगले यांनी केले आहे.