शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील बसस्थानका जवळ आज (दि 31) रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास बॅटरीवर चालणाऱ्या महिंद्रा चारचाकी गाडीला अपघात झाला. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने आणि गाडीने वेग घेतल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दगडांच्या डिगाऱ्यावरुन समोरच असणाऱ्या काटेरी झाडाला धडकून झाडात अडकली. सुदैवाने या गाडीत मालक अमोल मुखेकर हे एकटेच होते. त्यांना मुक्का मार लागला पण ते थोडक्यात बचावले.

याबाबत या गाडीचे मालक अमोल मुखेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चारच महिन्यांपूर्वी त्यांनी महिंद्रा कंपनीची बॅटरीवर चालणारी सुमारे अठरा लाख रुपये किमतीची एक्सयुव्ही ४०० ही गाडी खरेदी केली असून नेहमीप्रमाणे आज सकाळी ते या गाडीतून गावातील आपल्या दुकानात आले. दरम्यान कामानिमित्त बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी गाडी सुरु केली. गाडीचा एक्सलेटर अडकून राहिल्याने गाडीने वेग घेतला अमोल यांनी ब्रेक दाबून गाडी थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण गाडीने प्रचंड वेग घेतल्याने गाडी दगडांच्या ढिगाऱ्यावरुन थेट काटेरी झाडांना धडकून थांबली.

यात गाडीचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन अमोल हे या घटनेत थोडक्यात बचावले आहेत. या अपघाताबाबत कंपनीला कळविण्यात आले असुन पुढील कार्यवाही त्वरित करण्याचे आश्वासन कंपनीने अमोल मुखेकर यांना दिले आहे.