शिरुर शहरात सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न,बंदुकीच्या दस्त्याने कर्मचाऱ्याला मारहाण; पळून जाताना चोरट्यांकडून गोळीबार

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील भरवस्तीतील सोन्याचे दुकान लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरट्यांना दुकानातील कर्मचाऱ्याने विरोध केला. त्यामुळे झटापटीत कर्मचाऱ्याला बंदुकीचा दस्ता मारल्याने कर्मचारी जखमी झाला. मात्र या चोरट्यांनी जाताना गोळीबार केल्याने काही वेळ या भागातील नागरिक भयभीत झाले. ही जखमी घटना रविवार (दि २८) रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली.

शिरुर येथील भिकाजी एकनाथ पंडित (वय ६५) हे झटापटीत जखमी झाले असून एकनिष्ठ असलेल्या व ३४ वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पंडित यांच्यामुळे सोन्याच्या दुकानासह दुकानमालक यांचे प्राण वाचले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरुर शहरातील भरवस्तीतील सुभाष चौकात जगन्नाथ धोंडीबा कुलथे सराफ या नावाचे माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे यांचे दुकान आहे. त्या दुकानात भिकाजी पंडित हे कामाला आहेत. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरुन मास्क घातलेले दोघेजण दुकानात शिरले आणि त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांना प्रतिकार म्हणून चोर चोर ओरडून व त्यांना दुकानाबाहेर ढकलून दिले.

यावेळी चोरटे माल काढ म्हणून धमकावत होते. दरम्यान, या चोरट्यांनी पंडित यांना बंदुकीचा दस्ता मारला. यामध्ये पंडित जखमी झाले. तर चोरट्यानी गोळीबार पळून जाताना गोळीबार देखील केला. या गोळीबारानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरात घबराट उडाली त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी कुलथे यांचा दुकानासमोर धाव घेतली. दरम्यान पंडित यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

त्यानंतर घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस उपनिरिक्षक गणेश जगदाळे, अभिजित पवार, सुनील उगले, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांची बदली होताच चोरट्यांनी डोके वर काढले आहे. बेट भागात डिपी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शिरूर पोलिस स्टेशनला खमक्या आधिकाऱ्याची गरज निर्माण झाली आहे