Crime

पत्नीनेच केला पतीचा खून, पुरावा नष्ट करण्यासाठी केले भयंकर कृत्य…

क्राईम

जालना: शहरातील अंबड रोडवरील अर्चना नगर परिसरात ३० ऑगस्टच्या रात्री 9 च्या सुमारास व्यवसायाने वकील असलेल्या किरण लोखंडे यांचा स्वयंपाक घरात आग लागून गॅसचा स्फोट झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी मनीषा लोखंडे यांच्या माहितीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी नोंद करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात 8 दिवसानंतर तालुका पोलिसांनी मनीषा लोखंडे हिनेच अज्ञात कारणाने खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत्यूदेह जाळण्यासाठी गॅसचा स्फोट झाल्याचा बनाव केल्याचा आरोप ठेवत खुनाचा गुन्हा दाखल केल्याने जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.

दरम्यान 3 महिन्यापूर्वीच किरण लोखंडे यांचा विवाह मनिषा हिच्या सोबत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशान विभागाच्या जवानांनी घरातील आग विझवत गॅस पाईप कंपन्यात आल्याने आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. गॅस कंपनीकडून ही पाईप कापल्याने आग लागली असल्याची शक्यता वर्तवत कुठल्याही प्रकारचा टाकीचा स्फोट झाला नसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. या प्रकरणी किरण लोखंडे यांच्या नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता.

मनीषा लोखंडे हिच्यावर ही संशय व्यक्त केल्या जात होता. या प्रकरणी वकील महासंघाकडून आणि मराठा महासंघाकडून किरण लोखंडे यांचा खून करुन अपघात घडून आणल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी पोलिस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सबळ पुराव्याचा बारकाईने निरीक्षण करुन त्या आधारे अज्ञात कारणावरुन किरण लोखंडे यांचा खून त्यांची पत्नी मणीषा लोखंडे हिनेच करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत्यूदेह जाळण्यासाठी गॅसचा पाईप काढूनआग लावून गॅसचा स्फोट झाल्याचा बनाव केल्याचा आरोप ठेवत किरण लोखंडे यांच्या पत्नीविरोधात तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी मनीषा लोखंडे ला ताब्यात घेऊन या प्रकरणी अधिक तपास सुरु केला असून खुनाच्या कारणाचा शोध पोलिस घेत आहे.