जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर

क्राईम महाराष्ट्र

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना कमी होत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एका तरुणीने मित्राच्या मदतीनं एका तरुणाची हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. हत्या झालेला तरुण वारंवार त्रास द्यायचा म्हणून तरुणीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय दोन्ही आरोपी हे जिम ट्रेनर आहेत. त्यांची जिममध्येच हत्या झालेल्या तरुणाशी ओळख झाली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे याची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या करण्यात आली. यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांनी ही हत्या केलीय. प्रांजलला गोपीनाथ शिवीगाळ करायचा, पैशांची मागणी करत असल्यानं ती त्रासाला कंटाळली होती. यातूनच ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय.

प्रांजल आणि यश यांचं पार्टनरशिपमध्ये प्रोटीन पझल शॉप आहे. या शॉपमध्ये बुधवारी दुपारी गोपीनाथ आला होता. त्यावेळी पुन्हा एकदा प्रांजलला त्रास दिल्यानं त्यांच्यात वाद झाला. यावेळी प्रांजलने गोपीनाथला कानशिलात मारली. तेव्हा तिने यशच्या मदतीने गोपीनाथला मारहाण केली. डोक्यात रॉड घातल्यानं गंभीर जखमी झालेल्या गोपीनाथला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

गोपीनाथचा मृत्यू झाल्याचं समजताच प्रांजल आणि यश यांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. प्रांजल आणि यश हे ज्या जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतात तिथंच गोपीनाथ जिमला येत होता. वर्षभरापूर्वी गोपीनाथ आणि प्रांजलची ओळख झाली होती. गोपीनाथ प्रांजलकडे पैशांची मागणी का करायचा? शिवीगाळ देऊन त्रास का द्यायचा? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.