नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून नात्याने ‘बाबा’ म्हणणाऱ्या व्यक्तीने तिला सोबत नेल्याचा आरोप असून, याप्रकरणी सोनखेड पोलिसांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) पहाटे पोक्सो कायद्यासह इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या संबंधित व्यक्तीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत नेले. सुमारे २० ते २५ मिनिटांनी तो मुलीला घरी सोडून निघून गेला.
मुलगी सतत रडत असल्याचे लक्षात आल्यानंतर आईने तिची विचारपूस केली. त्यानंतर मुलीने आपल्यासोबत गैरप्रकार झाल्याचे सांगितले. मुलीला दुखापत झाल्याचे लक्षात येताच पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील विष्णूपुरी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पहाटेच्या सुमारास संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सोनखेड पोलीस करत आहेत