माझी इच्छा नव्हती, दोन पानी चिठ्ठी लिहून तरुणान संपवलं जीवन

क्राईम महाराष्ट्र

सोलापूर: सोलापूर येथील दमाणी नगरातील पावन गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अरुण रोडगे व शकलेश जाधव यांच्या त्रासाला कंटाळून आनंद दादाराव शिंदे याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मृताची आई अंजना शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मृत आनंद व संशयित आरोपी यांच्यात ओळख होती. यापूर्वी सात रस्ता, लकी चौक अशा ठिकाणी त्यांच्यात भांडणे झाली होती आणि आपापसांत वाद मिटले देखील होते, असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून १५ जुलै रोजी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास आनंद हा डोणगाव रोडवरील मावशी शहाबाई रमेश जगताप यांच्या घरात छताच्या वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पोलिसांना आनंदच्या खिशात दोन पानी सुसाईड नोट सापडली. गुन्हा दाखल होताच दोन्ही संशयित आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संशयित आरोपी मृत आनंदला नेमका कोणत्या कारणातून त्रास देत होते, याचा शोध पोलिस उपनिरीक्षक सूरज कुतवळ करीत आहेत.

पत्नी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी माहेरी

आनंद याला दोन मुली असून, त्याची पत्नी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली आहे. दरम्यान, आनंदने सुसाईड नोटमध्ये आई-वडिलांसह पत्नी व मुलींची माफी देखील मागितली असून, त्या दोघांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सहा महिन्यापूर्वी त्याचं भांडण झाल्यावर आनंदला खूप मारलं होतं. यामुळं त्यानं आत्महत्या केली. तसेच ४ वर्षापूर्वी पहिला मुलगा गेला, आता दुसरा मुलगाही गेला असं सांगत आनंदची आई अंजना शिंदे यांना रडू कोसळले.