मुंबई: स्टार प्रवाहवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’. मालिकेतील सध्याचे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड भावत असून जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी यांच्यातील नातेसंबंधांमध्ये नवनवीन वळणं येताना पाहायला मिळत आहेत.
मालिकेत जीवा आणि काव्या आपल्या भूतकाळातील सत्य उघड झाल्यानंतर पार्थ आणि नंदिनीला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, या दरम्यान जीवा नंदिनीच्या तर काव्या पार्थच्या प्रेमात पडलेले दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे दोघांनीही आपापल्या खऱ्या जोडीदाराचं मन पुन्हा जिंकण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. प्रोमोमध्ये काव्या जीवाला समजावताना दिसते. ती म्हणते की, “लवकरच गैरसमजांची धूळ पुसली जाईल आणि नंदिनी ताईंना तुझं आणि पार्थला माझं लग्नानंतरचं प्रेम दिसेल.” हे संभाषण पार्थ ऐकतो आणि तो तात्काळ नंदिनीला भेटायला जातो.
पार्थ नंदिनीला सांगतो, “आज मी जीवा आणि काव्याला छान मित्रासारखं बोलताना पाहिलं. ते लग्नापूर्वीचा भूतकाळ विसरून आपल्यासाठी पुढे आले आहेत. आता आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवं.” पार्थचे हे शब्द ऐकून नंदिनी आनंदी होते.
हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आता दोन्ही जोड्यांची लव्हस्टोरी दाखवा,” “रम्या आणि आत्या यांना बाजूला सारून दोन्ही जोड्या एकत्र आणा,” अशा कमेंट्स चाहत्यांकडून केल्या जात आहेत.दरम्यान, रम्या आता काही नवीन कारस्थान रचणार का? मालिकेत आणखी कोणता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहत राहा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, दररोज संध्याकाळी ७ वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.