अमली पदार्थ प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला

क्राईम महाराष्ट्र

तलवार, चॉपर, हॉकी स्टिक, गावठी कट्ट्याने हल्ला; चार जण जखमी

मुंबई: अमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकावर आठ जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उलवा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी रात्री उलवा सेक्टर १९ येथील शगुन चौक परिसरात संशयित आरोपींच्या शोधात मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले होते. यावेळी काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक पुढे सरसावले असता, संशयितांनी अचानक पोलिसांवर हल्ला चढवला.

तलवार, चॉपर, फायटर पंचचा वापर

हल्लेखोरांकडे चॉपर, तलवार, हॉकी स्टिक, फायटर पंच तसेच एका आरोपीकडे गावठी कट्टा आढळून आला आहे. या हल्ल्यात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांच्यासह पोलीस मित्र फिरोज सिद्दीकी, अहमद रजा कुरेशी आणि अतुल जैस्वाल हे जखमी झाले आहेत.

संशयित आरोपींची नावे

या प्रकरणी शाहिद खान, आयाज खान, आसिफ खान, इस्माईल शेख, मेहराज खान यांच्यासह आठ जणांविरोधात उलवे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

स्थानिक पोलिसांची माहिती न दिल्याने प्रश्नचिन्ह

विशेष बाब म्हणजे, मुंबई पोलिसांच्या पथकाने कारवाईपूर्वी स्थानिक उलवा पोलिसांना माहिती दिली नव्हती. स्थानिक पोलिसांची मदत न घेता कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, हल्लेखोरांना समोर असलेले पथक पोलीस असल्याची माहिती नसल्याने त्यांनी हल्ला केल्याचा दावा पोलीस सूत्रांकडून करण्यात आला आहे.घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.