मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवाच्या परंपरा, लोकसंस्कृती, आठवणी आणि सामाजिक एकोप्याचा वारसा जगभर पोहोचविण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हे डिजिटल व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
मुंबईतील बँडस्टँड येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसांच्या सांस्कृतिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अभिनेते अमेय वाघ, चित्रपट निर्माते, लेखक व अभिनेते निपुण धर्माधिकारी, ‘बाप्पा डॉट ओआरजी’चे संस्थापक श्रीपाद अष्टेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
गणेशोत्सवाची परंपरा जगासमोर मांडणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीपासून गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. यंदा महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांसह जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या विविध भागांत गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दुबईसह परदेशातही गणेशोत्सवाचे कार्यक्रम होत असल्याने या उत्सवाची व्याप्ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सीमांपलीकडे पोहोचत असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून कला, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय भावनेचे दर्शन घडविणारा उत्सव आहे. जात, धर्म आणि भाषेच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणणाऱ्या या उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यानंतर आता गणेशोत्सवाला अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आठवणी, छायाचित्रे आणि परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण
‘बाप्पा डॉट ओआरजी’ या डिजिटल व्यासपीठावर नागरिकांना गणेशोत्सवाशी संबंधित आपल्या आठवणी, कथा, छायाचित्रे आणि पारंपरिक प्रथांची माहिती नोंदविता येणार आहे. या माध्यमातून गणेशोत्सवाशी जोडलेले भावनिक नाते, ऐतिहासिक संदर्भ आणि पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण केले जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल ‘कल्चरल प्रिझर्व्हर सर्टिफिकेट’ देण्यात येत आहे. नागरिकांनी क्यूआर कोड किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी होऊन गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन शेलार यांनी केले.
उखाणे, ओव्या, म्हणी आणि पारंपरिक खेळांच्या स्पर्धा
‘बाप्पाचा कट्टा’ या उपक्रमांतर्गत उखाणे, म्हणी, ओव्या, पारंपरिक खेळ आणि विविध कलांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. ऑनलाइन प्राथमिक निवडीनंतर सहभागी कलाकारांना प्रत्यक्ष सादरीकरणाची संधी मिळणार असून, विजेत्यांना पारितोषिके आणि करंडक देण्यात येतील.
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे जतन करणे आणि हा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केवळ परंपरांविषयी बोलण्यापुरते मर्यादित न राहता त्या जतन करणाऱ्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी केले.
संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम : निपुण धर्माधिकारी
‘बाप्पा डॉट ओआरजी’च्या माध्यमातून संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधला जात आहे. बाप्पाच्या गोष्टी, रूढी आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ उपयुक्त ठरेल. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात अधिकाधिक नोंदणी करावी, असे आवाहन अभिनेते निपुण धर्माधिकारी यांनी केले.
महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोहोचविण्याची गरज : अमेय वाघ
सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने रुजवली. धर्म आणि जातीचे भेद विसरून एकत्र येण्याची ही भावना आजही जपली पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती केवळ राज्यापुरती किंवा देशापुरती मर्यादित न राहता जगभर पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे, असे मत अभिनेते अमेय वाघ यांनी व्यक्त केले.
९० दिवसांत लोकपरंपरांना डिजिटल व्यासपीठ
‘बाप्पाचा कट्टा’च्या माध्यमातून पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे ‘बाप्पा डॉट ओआरजी’चे संस्थापक श्रीपाद अष्टेकर यांनी सांगितले. पुण्यात सकाळी आणि मुंबईत संध्याकाळी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी व्हॉट्सॲपवर ‘बाप्पा डॉट ओआरजी’शी जोडून ‘बाप्पा’ असा संदेश पाठवावा आणि आपल्या कथा, आठवणी व परंपरांची माहिती नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, सामाजिक एकोपा आणि ऐतिहासिक परंपरांचे दस्तऐवजीकरण करून हा वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या दृष्टीने ‘बाप्पाचा कट्टा’ हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.