नवी मुंबई: शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादुर, ज्यांना “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाते, यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता सामूहिक गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक उपक्रमात कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, तब्बल ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी सहभागी होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सर्व शैक्षणिक संस्थांना केले आहे.
जागतिक विक्रमाची नोंद
या विशेष उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स ’ या संस्थेकडून घेतली जाणार असून, मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी होणाऱ्या सामूहिक गायनाची विक्रम नोंद केली जाणार आहे.
गुरु तेग बहादुरजींच्या स्मृतीनिमित्त २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नवी मुंबई येथील खारघर, सेक्टर २९ मधील ओवे मैदानात मुख्य ‘शहिदी समागम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सरताज सिंह यांनी गुरुजींच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीत सादर केले असून, हेच गीत २३ फेब्रुवारी रोजी सर्व शाळांमध्ये एकाच वेळी गायले जाणार आहे.
स्पर्धा परीक्षेचे आयोजन
सामूहिक गायनानंतर गुरु तेग बहादुर यांच्या जीवनकार्यावर आधारित ऐच्छिक स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुरुजींच्या बलिदान आणि शौर्याबाबत अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले.
विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना या उपक्रमाचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमधून संबंधित जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या कार्यक्रमाचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
“या उपक्रमातून नवीन पिढीला राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा मिळेल. कोकण विभागातील प्रत्येक विद्यार्थ्याने आणि नागरिकाने या राष्ट्रभक्तीपर कार्यात सहभागी व्हावे,” असे आवाहनही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.