जेजुरी: अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळींची संघर्षमय कहाणी मोठ्या पडद्यावर येत आहे. आगामी मराठी चित्रपट ‘फुला’ चे पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे लाँच करण्यात आले. वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण झाले. यावेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
दमदार तांत्रिक टीम
पै. अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शक अभिषेक जावीर असून पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अमर देवकर (सर्जनशील दिग्दर्शन), प्रताप जोशी (छायांकन), अतुल लोखंडे (कला दिग्दर्शन), राहुल प्रजापती (संकलन), कोमल जावीर व अक्षता पाटील (वेशभूषा), समाधान भोरे (रंगभूषा) यांनी तांत्रिक बाजू मजबूत केली आहे.
नामवंत गायकांचा आवाज
चित्रपटातील गाण्यांना प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, गायक रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली इंगवले, वैष्णवी अदोडे आणि आकाश नवगिरे यांनी आवाज दिला आहे.प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण आणि टीम ही आटपाडी गावातील असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
स्त्री कलाकारांच्या अस्तित्वाची कहाणी
‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते.
दिग्दर्शक अभिषेक जावीर म्हणाले, “‘फुला’ हा केवळ एका मुलीची शोकांतिका नाही, तर महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांमध्ये अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्वाचा जिवंत दस्तावेज आहे. मुरळी परंपरेतील अनेक स्त्रियांना स्वप्नं, हक्क, प्रेम आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळत नाही. समाज त्यांची कला घेतो; पण त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही. हे वास्तव प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.”वाघ्या-मुरळी परंपरेच्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला ‘फुला’ हा चित्रपट सामाजिक भान आणि लोकसंस्कृतीचा संगम ठरणार का, याकडे आता रसिकांचे लक्ष लागले आहे.