प्रा. वामन केंद्रे यांना उज्जैनचा ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ जाहीर

मनोरंजन

मुंबई: महाकवी कालीदासांची नगरी उज्जैन येथील अभिनव रंगमंडळ या अत्यंत महत्त्वाच्या नाट्य संस्थेच्या वतिने आपल्या ४० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान २२’ घोषणा नुकतीच करण्यात आली आणि हा पहिला पुरस्कार पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांना त्यांच्या एकुणच भारतीय रंगभुमी वरील अतुलनीय योगदानासाठी जाहीर झाला आहे.

नाट्य दिग्दर्शनात त्यांनी केलेले धाडसी आणि पथदर्शी प्रयोग, भारतीय रंगमंचावर त्यांनी निर्माण केलेली रंगभाषा, आधुनिक नाट्य प्रशिक्षणात त्यांनी केलेले अमूल्य योगदान व देशभर घडवलेले हजारो कलाकार, रंगभुमी संदर्भातले त्यांनी केलेले संशोधन,उभ्या केलेल्या महत्त्वाच्या नाट्य संस्था व प्रस्थापित संस्थांच्या विकासामध्ये केलेले अनोखे योगदान तसेच भारतीय रंगभुमीच्या विकासात सुरु केलेले पायाभूत उपक्रम, भारतीय रंगभूमीला मिळवून दिलेली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा, या सगळ्यांचा हा राष्ट्रीय पुरस्कार देताना विचार करण्यात आला व पुरस्कार समितीच्या वतिने सर्व सम्मतीने व एकमताने हा सन्मान प्रा. केंद्रे यांना जाहीर करण्यात आला.

हा पुरस्कार रोख रक्कम ५१ हजार रूपये, सन्मान चिन्हं, शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा आहे. सदर सन्मान प्रा. केंद्रे यांना १५ ॲाक्टोबर रोजी उज्जैन येथे होणा-या अभिनव रंगमंडळाच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या समापन सोहळ्यात समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

भारतीय समृद्ध साहित्य परंपरेतले अग्रणी महाकवी आणि महान नाटककार कालीदास यांच्या नगरीतुन मिळणारा हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी साक्षात कालीदासांचा आशिर्वादच आहे असे मत प्रा. वामन केंद्रे यांनी व्यक्त केले तसेच या सन्मानासाठी अभिनव रंगमंडळचे सर्वेसर्वा श्री. शरद शर्मा, श्री. डी.बी. गुप्ता, पुरस्कार समिती सदस्य व त्यांचे सर्व सहकारी यांचे त्यांनी मनापासुन आभारही मानले.

प्रा. केंद्रे यांना मिळणारा हा सहावा राष्ट्रीय पुरस्कार आहे. या पुर्वी त्यांना भारत सरकारच्या वतिने पद्मश्री, केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मध्य प्रदेश शासनाचा राष्ट्रीय कालीदास सन्मान, एन. एस. डी. चा ब. व. कारंत स्मृती पुरस्कार तसेच मनोहर सींग स्मृती पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विशेष म्हणजे एन. एस. डी. चे उपरोक्त दोन्ही राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे राष्ट्रीय नाट्य विद्दालयाचे ते पहिले स्नातक आहेत.