कष्टकरी वडिलांचे महान दान; ससून रुग्णालयात मुलाला मिळाले नवजीवन

महाराष्ट्र

सोलापूर: सोलापुरातील शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे वडील आणि पुण्यात सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारा ३३ वर्षीय मुलगा असं साधं, कष्टाळू कुटुंब. मात्र, दीड वर्षांपूर्वी उच्च रक्तदाबामुळे मुलाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आणि कुटुंबावर संकट कोसळलं.

खासगी रुग्णालयांत प्रत्यारोपणासाठी १० ते ११ लाखांचा खर्च सांगण्यात आल्याने कुटुंब हतबल झाले. मुलाला नियमित डायलिसिस घ्यावे लागत होते. आर्थिक अडचणी असूनही तो ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करत उपचाराचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत होता. माळशिरसमध्ये शिवणकाम करणारे वडील हेच कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.

दरम्यान, पुण्यातील ससून रुग्णालय येथे कमी खर्चात किडनी प्रत्यारोपण होते, अशी माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी चौकशी केली. समाजसेवा अधीक्षक तथा अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे आणि अरुण बनसोडे यांनी विविध शासकीय योजना व सामाजिक संस्थांच्या मदतीबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर वडिलांनी मुलासाठी किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

डॉ. संदीप मोरखंडीकर आणि डॉ. निरंजन आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, शल्यचिकित्स विभागप्रमुख डॉ. लता भोईर आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमप्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १८ फेब्रुवारी रोजी ‘फादर टू सन’ ही ३६ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत करण्यात आली. तसेच औषधे, तपासण्या व साहित्याचा अतिरिक्त खर्च सर दोराबजी टाटा ट्रस्ट, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, ओसवाल बंधू समाज, मुकुल-माधव फाउंडेशन आणि रंभा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मदतीतून उचलण्यात आला.

सध्या रुग्ण आणि किडनीदाता दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. गरीब आणि गरजू रुग्णांनी किडनी किंवा यकृत प्रत्यारोपणासंदर्भात माहिती व मदतीसाठी ससून रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी केले आहे.कष्ट, माया आणि त्याग यांच्या बळावर एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेलं हे नवजीवन समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.