मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवत दिवस खास केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी तिने घेतलेल्या एका निर्णयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताने आता व्हेगन होण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राजक्ताने वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने आपल्या आयुष्यातील या नव्या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली.
प्राजक्ताने सांगितले की, व्हेगन होण्याचा निर्णय तिने केवळ स्वतःच्या इच्छेने घेतलेला नाही. तिच्या शरीराने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे तिला सतत खोकल्याचा त्रास होत असल्याचेही तिने नमूद केले.
यापुढे आपण चहा आणि कॉफीही घेणार नाही, असे सांगत प्राजक्ताने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिचे शरीर आता काही ‘तामसिक’ गोष्टी नाकारत असल्याचेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या निर्णयाबद्दल प्राजक्ताने ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले आहे’ असे म्हटले आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच तिच्या नव्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या या निर्णयाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. वाढदिवसाच्या दिवशी तिने घेतलेला हा निर्णय तिच्या चाहत्यांसाठी निश्चितच अनपेक्षित ठरला आहे.