मुंबई: मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांच्या नात्यातील सूक्ष्म तणाव अधिक ठळकपणे समोर येतो. अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याचे काम सांभाळताना सायलीची अक्षरशः तारांबळ उडते. चैतन्य तिच्या मदतीला असला तरी अर्जुनच्या जबाबदाऱ्यांचे गांभीर्य तिला आता उमजू लागते. तरीही ती मुद्दाम अर्जुनला फोन करून त्याची चिडवाचिडवी करते. कपडे वाळत घालत असताना ती त्याला “जेवण झालं का?” असा प्रश्न विचारते. अर्जुनही कमी नाही—तोही तिच्या कामावरून टोमणे मारत दोघांमध्ये हलकीफुलकी पण तणावपूर्ण खटके उडतात. मात्र दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असतात.
दरम्यान, कथानकात मोठी कलाटणी देणारा नागराजचा डाव पुढे सरकतो. तो लाचखोर पोलिसांच्या मदतीने महिपतला दुसरीकडे हलवण्याची व्यवस्था करतो आणि लगेचच प्रियाला फोन लावतो. तुरुंगात फोन पाठवण्याची जोखीम का घेतली, असा सवाल तो तिला करतो. प्रिया गोड बोलून स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करते. मात्र नागराज तिचा खरा हेतू ओळखतो. तो स्पष्ट सांगतो की तो पोलिसांना “तू खरी तन्वी नाहीस” हे सांगणार नाही, पण त्याबदल्यात तिला त्याचे एक काम करावे लागेल. त्यांची नेमकी योजना प्रेक्षकांपासून लपवण्यात आली असली तरी लवकरच मोठा कट उघड होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाय नागराज प्रियाला सायली-अर्जुनवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देतो. प्रिया कबूल करते की तिनेच दोघांमध्ये मुद्दाम दुरावा निर्माण केला, जेणेकरून ते नागराजविरोधात पुरावे गोळा करू शकणार नाहीत.
दुसरीकडे, घरात अर्जुनची किचनमध्ये धांदल उडालेली दिसते. मसाले कोणते आणि कसे वापरायचे याची त्याला अजिबात कल्पना नसते. प्रतापच्या सांगण्यावरून कल्पना त्याच्या मदतीला धावते. ती त्याला प्रत्येक मसाल्याची ओळख करून देते. त्यात “चक्रीफूल” पाहून अर्जुन आश्चर्यचकित होतो. कल्पना सांगते की सायलीला ते खूप आवडते, पण अर्जुनला नको म्हणून ती कधीच वापरत नाही. हे ऐकून अर्जुनला सायलीच्या प्रेमाची जाणीव होते आणि त्याच्या मनात तिच्याबद्दल अधिक आपुलकी निर्माण होते.
दरम्यान, सायली नागराजच्या २२ वर्षांपूर्वीच्या अपघातप्रकरणाचा धागा पकडते. त्या ट्रकचा मालक कोण होता, हे शोधण्याचा ती निर्धार करते. चैतन्य बाबुला बोलावतो. बाबू सांगतो की त्या अपघातात गाडीतली कोणतीही व्यक्ती जिवंत राहू नये, अशी ऑर्डर होती. अपघाताच्या दिवशी मूळ ट्रक बंद पडल्याने महिपतने ऐनवेळी दुसरा ट्रक अरेंज केला होता.
फ्लॅशबॅकमध्ये २२ वर्षांपूर्वीचे प्रसंग उलगडतात. नागराज स्वतःच्या ओळखीच्या चालकाला ट्रक पाठवायला सांगतो. बाबूला त्या ट्रक मालकाचा चेहरा आठवत असल्याचे समजताच सायली त्याचा स्केच तयार करण्यास सांगते. स्केच आर्टिस्टच्या मदतीने तयार झालेले चित्र पाहून बाबू खात्रीने सांगतो—“हाच तो माणूस!”
आता या स्केचमुळे नागराजच्या भूतकाळातील गूढ उलगडणार का? सायली-अर्जुनमधील गैरसमज दूर होतील का? आणि प्रियाचा गुप्त डाव काय आहे? पुढील भागात याची उत्कंठावर्धक उत्तरे मिळणार आहेत.