फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा पाहायला मिळणार

मनोरंजन

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल.

मालिका जरी गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. जीजी अक्का ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी मालिकेचं पुन:प्रसारण होतोय याविषयी आनंद व्यक्त केला आहे.

‘माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं होतंय की एखादी मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रेमापोटी लगेच त्या मालिकेचे भाग पहिल्यापासून दाखवले जाणार आहेत. माझ्याकडे आनंद व्यक्त करायला शब्दच नाहीत. जीजी अक्कासारख्या विचारांच्या बायका आजही समाजात आहेत. ज्यांच्यासाठी घर, संसार आणि कुटुंब हेच त्यांचं आयुष्य आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पात्र कुठेही नकारात्मक झालं नाही.

शुभम ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता हर्षद अतकरी म्हणला, ‘फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम साकारणं अभिनेता म्हणून खुपच कठीण होतं. कठीण यासाठी म्हणतोय कारण सध्याच्या काळात शुभम सारख्या मनाने चांगल्या असणाऱ्या व्यक्ती फारच क्वचित सापडतील. या मालिकेने शुभमचा चांगुलपणा, शांतपणा, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती अश्या खूप गोष्टी दिल्या. हे पात्र नेहमीच मनाच्या जवळ राहिल. ५ डिसेंबरपासून पुन्हा प्रेक्षकांना शुभम-कीर्तीचा प्रवास रिपिट टेलिकास्टच्या रुपात अनुभवायला मिळेल याचा आनंद आहे.’

तर कीर्ती हे पात्र साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर म्हणाली, ‘फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आणि त्यातलं मी साकारलेलं कीर्ती हे पात्र माझ्यासाठी ड्रीमरोल होता. या पात्राच्या निमित्ताने प्रेम, भांडण, पोलीस खात्यातलं कर्तव्य, कर्तव्य बजावताना करावे लागलेले स्टण्ट्स हे सगळं करण्याची संधी मिळाली. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की हे पात्र साकारायला मिळालं. मात्र ज्याची सुरुवात होते त्याचा शेवटही ठरलेला असतो. या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.