‘गुल्हर’ मराठी चित्रपट राज्यभर प्रदर्शित; मोहनवर कौतुकाचा वर्षाव…

मनोरंजन

‘गुल्हर’ या मराठी चित्रपटाचे ग्रामीण भागातील युवकाने कथालेखन केले असून, चित्रपट राज्यभर प्रदर्शित झाला आहे. शिरूर तालुक्यातील युवक मोहन एकनाथ पडवळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे…

काव्य लेखन, सामाजिक लेखन, पथनाट्य, व्यवसायिक नाटक आणि आता गुल्हर या चित्रपट क्षेत्रातील लेखणीच्या माध्यमातून दमदार पदार्पण. असा प्रवास असलेले कवठे येमाई (ता. शिरूर) येथील युवक मोहन एकनाथ पडवळ या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलाने लिहिलेल्या कथेवर आधारीत ‘गुल्हर’ चित्रपट शुक्रवारी राज्यभर प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच शो ला शिरूर तालुक्यातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्या भागातील भूमीपूत्राच्या या कलाकृतीला दाद देण्यासाठी शिरूरचे नोव्हा गोल्ड थिएटर खच्चून भरले होते.

शिरूरच्या प्रिमियर शो ला गुल्हरचे कथालेखक स्वतः मोहन पडवळ उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता शो होता परंतू त्याअगोदरच थिएटरच्या बाहेर मोहन पडवळ यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. अनेकांना यावेळी सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. विशेषत: कवठे येमाई भागातून खास चारचाकी वाहनांमधून आपल्या कुटुंबियांसह आलेल्या लोकांची उपस्थिती वाखानण्याजोगी होती, तसे सकाळपासूनच गुल्हरच्या पहिल्या शो चे मेसेज शुक्रवारी दिवसभर शिरूरकरांच्या काट्सअप ग्रुप वर फिरत होते. त्यामुळे या चित्रपटाबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

गुल्हर नावाच्या एका लहान मुलावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. राम लक्ष्मण मोठा राजदरबारी… राजा दशरथ त्याचा तोरा लई भारी… या गाण्याने चित्रपटाची सुरुवात होते. त्यानंतर खिळवून ठेवणारे ग्रामीण बाजाचे कथानक, सुमधुर संगीत, कधी हास्याचे फवारे तर कधी डोळ्यांच्या कडा ओलावणारे भावस्पर्शी क्षण अशा वातावरणात जातो अन कधी संपतो ते ही कळत नाही. चित्रपट संपल्यानंतर अनेकांनी मोहनच्या पाठीवर थाप मारत कौतुकाची मोहोर उमटवली, शिरूर तालुक्यातील स्थानिक परंतू नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहणाऱ्या लोकांनी पुण्यातच या चित्रपटाचा आनंद लुटला.

कवठे येमाई हे कलावतांचे गाव म्हणुण ओळखले जाते. या गावातील तमाशा  कलावंत गंगाराम बुवा कवठेकर ढोलकीपटटू म्हणूण राज्यभर प्रसिद्ध होते. त्यांना राज्य सरकारचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.तमाशाचे फड गाजवले.बी.के.मोमीन कवठेकर यांनी तमाशासाठीअनेक वग व गाणी लिहीली. आता अनेक युवक शॉट् फिल्म, कथालेखन, गायन करुन आपली कला जोपासत आहे. त्यासाठी त्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे आहे.

पुण्यात नामवंत कलाकारांसोबत प्रिमियर शो चे नियोजन होते परंतू आपल्या लोकांसोबत मला चित्रपटाचा आनंद लुटायचा होता त्यामुळे मी शिरूर ला थांबलो पण मजा आली. भरपूर एन्जॉय केला.काल माझ्या गुल्हर सिनेमावेळी आख्खं कुटुंब आणि मित्र परिवार थिएटरला जमला. सिनेमा सुरु झाला आणि प्रथम माझं नाव भल्या पडद्यावर झळकलं मोहन एकनाथ पडवळ आणि हे वाचायला अण्णा माझे वडील आज नाहीत. मिस केलं त्यांना म्हणूनच एक तिकीट काढून माझ्या शेजारची खुर्ची रिकामी ठेवली. होय ते बसले होते माझ्यासोबत अभिमानाची बाब. आख्ख थिएटर गच्च भरलं होतं. शेवटी आम्हाला दाद म्हणून टाळ्या पडल्या.