तळेगाव ढमढेरेतील कार्यक्रमाला छगन भुजबळांची दांडी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे मोठ्या उत्साहात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला असताना आयोजकांकडून प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले छगन भुजबळ यांनी अखेर या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत दांडी मारल्याचे दिसून आले असून यामध्ये आयोजकांचे अपुरे नियोजन कि आयोजकांचे अपयश असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे नुकतेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आलेले होते, सदर कार्यक्रमासाठी आयोजकांकडून प्रमुख उपस्थिती म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री अतुल सावे यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. परंतु मोठ्या उत्साहात पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडत असताना छगन भुजबळ, अतुल सावे या दोघांसह स्थानिक आमदारांनी देखील या कार्यक्रमाला दांडी मारली तर आमदार अशोक पवार यांच्या पत्नी जिल्हा परिषेदेच्या कृषी व पशु संवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार, यांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमासाठी माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, काकासाहेब पलांडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्घाडे, पंचायत समितीचे सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, डॉ. वर्षा शिवले, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, कात्रज दुध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे, यांसह ठराविक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी आयोजकांकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री अतुल सावे यांच्या फोटोंसह जाहिरात बाजी करुन लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आलेली आहे, मात्र कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी लाखो रुपयांची उधळण करुन देखील नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाला आहे. मात्र आयोजन कमिटीमध्ये समता परिषदेच्या काही नेत्यांना जाणीवपूर्वक विचारात न घेतल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दांडी मारली असल्याची चर्चा शिरुर तालुक्यात चांगलीच रंगली आहे.

तळेगाव शिक्रापूर रस्त्यावरील खड्डे बुजणार का…?

तळेगाव ढमढेरे ते शिक्रापूर रस्त्याचे मध्यभागी असलेल्या फरशीचा ओढा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पूर आल्याने रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले असून सदर खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत मात्र आता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे सदर रस्त्यावरुन येऊन गेलेले असल्याने आता तरी खड्डे बुजणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व पक्षीयांची हजेरीच नाही…

तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रम साठी सर्व पक्षीय नेत्यांची हजेरी असणार असल्याचे बोलले जात असताना सदर कार्यक्रमाच्या आयोजकांच्या चुकीच्या नियोजनामुळे सर्व पक्षीय नेत्यांची हजेरीच कार्यक्रमाला लागली नाही.