मुंबई: मराठी कलाविश्वात सध्या लग्नांचा उत्साह रंगत आहे. नुकताच ‘फ्रेशर्स’ मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरीडने लग्नगाठ बांधली, त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील ऋत्विक तळवलकरसुद्धा विवाहबंधनात अडकला.
आता यात आणखी एक लोकप्रिय कलाकार जोडी सामील होणार आहे. अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
साक्षीच्या घरी लग्नाआधीच्या विधींची सुरुवात झाली असून, तिने या सोहळ्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला असून, साक्षीने चाहत्यांसोबत या क्षणांची झलक शेअर केली आहे. तसेच, अथर्वच्या घरालाही लग्नासाठी आकर्षक सजावट करण्यात आली असून, त्याने घरातील रोषणाईचे फोटो सोशल मीडियावर दिले आहेत.
दोघांच्या लग्नाला फक्त तीन दिवस उरले आहेत. या संदर्भात साक्षी-अथर्व यांनी त्यांच्या सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत ‘3 Days To Go’ असा संदेश दिला आहे. त्यामुळे आगामी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी या जोडीने लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे.
साक्षी महाजन ही स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि सेटवर कलाकारांनी तिचं खास केळवण साजरं केलं. दरम्यान, साक्षीने गेल्या वर्षी एका मुलाखतीत २०२६ मध्ये लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी अथर्वसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची घोषणा केली आणि दोघांनी युनिक हॅशटॅग #साAThदेखील तयार केला आहे.साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांच्या लग्नाला चाहत्यांकडूनही मोठ्या उत्सुकतेने अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.