मुंबई: बिग बॉस मराठी सिझन ६ प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत आहे. घरातील वातावरण जसजसं तापत आहे, तसतसं स्पर्धकांचे विविध रंग देखील प्रकट होत आहेत. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांना नारळ देण्यात आले आहेत, तर इतर स्पर्धकांमध्ये बाचाबाची आणि शाब्दिक चकमक सुरू आहे.
यावेळी रितेश देशमुख स्पर्धकांना नियमबद्ध आणि योग्य वर्तनासाठी धारेवर धरताना दिसत आहेत. विशेषत: विशाल कोटियन आणि प्रभू शेळके यांच्यातील शाब्दिक चकमक काही दिवसांपासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. एका टास्कमध्ये प्रभूने विशालला जोरात पाण्यात फेकल्यावर, विशालने त्याला नॉमिनेशनचा इशारा दिला, परंतु नंतर माफीही मागितली. यानंतर रितेशने प्रभूला त्याच्या धक्क्यावर चांगलंच झापलं.
अलीकडेच कलर्स मराठीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये विशाल आणि प्रभू यांच्यातील तणावपूर्ण भांडण पाहायला मिळते. प्रोमोमध्ये विशाल प्रभूला म्हणतो, “तू माझ्यासाठी इतका महत्वाचा नाही आहेस”, तर प्रभू प्रत्युत्तर देतो, “तुम्हाला घमंड आला आहे. बॉडी असूनही उपयोग नाही”. नंतर विशाल प्रभूला सांगतो, “तू नॉमिनेटेड आहेस, मला तुला फुटेज नाही द्यायचं. तू जा..” तर प्रभू जोरात उत्तर देतो, “डॉन म्हणतायेत मला डॉन. मला हलक्यात घ्यायचं नाही हं. दुसऱ्याची वाट लावून मी बाहेर जाणार”.
दोघांचा आवाज आणि तणाव यावेळेस प्रचंड वाढतो, आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रोमोच्या कॅप्शनमध्ये कलर्स मराठीने म्हटलंय, “डॉन अन् विशालच्या भांडणामुळे फूल फायरी झालंय, बिग बॉस घरातील वातावरण..
नेटिझन्सनी देखील या प्रोमोवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी विशालची बाजू घेतली आहे, तर काहींनी प्रभू शेळकेला समर्थन दिले आहे. एकाने तर म्हटले आहे, “हा छोटा डॉन आणि रोशन संधी मिळाली की सिम्पथी घेतात”. सध्या प्रेक्षक या वादाच्या पुढील भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.