मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग आजही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. चित्रपटांसोबतच मालिकांमधूनही ते सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे.
आता लोकप्रिय ‘तारिणी’ या मालिकेत अनंत जोग यांची एंट्री झाली असून ते या मालिकेत राजकारणी बापुराव जामखंडे ही भूमिका साकारत आहेत. कथानकानुसार बापुराव जामखंडे कौशिकच्या न्यूज चॅनेलवर मुलाखतीसाठी येणार असतात. मात्र याच दरम्यान कौशिकी आजारी पडते आणि ही मुलाखत घेण्याची जबाबदारी केदारकडे येते.या मालिकेत कौशिकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने नुकतीच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनंत जोग यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली,
“जेव्हा मला कळलं की अनंत दादा जामखंडेची भूमिका साकारणार आहेत, तेव्हा मी पहिलाच प्रश्न विचारला – माझे त्यांच्यासोबत सीन आहेत का? पण जेव्हा कळलं की तसे सीन नाहीत, तेव्हा थोडंसं वाईट वाटलं. नंतर लक्षात आलं की माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक भीती होती.”
अभिज्ञा पुढे म्हणाली, “मी जेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाहिलं, तेव्हा वाटलं – या माणसाच्या डोळ्यांत बघून आत्मविश्वास दाखवू शकलेस, तर तू जग जिंकशील. त्यांनी साकारलेली पात्रं बाजूला ठेवली तरी त्यांचा ऑरा इतका स्ट्रॉंग आहे की त्यांच्यासमोर टिकून राहणं हेच मोठं आव्हान आहे. मला त्यांच्यासोबत सीन करायचे होते. कधीतरी आमचे एकत्र सीन असावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. पण त्यांच्या सोबत स्क्रीन शेअर करतेय, याचाच मला खूप आनंद आहे.”
ती पुढे म्हणाली,“मी कधी कल्पनाही केली नव्हती की मी त्यांच्या आजूबाजूला असेन किंवा त्यांचा पाच मिनिटांचा सहवासही मला मिळेल,” असे सांगत तिने अनंत जोग यांच्यासोबत काम करण्याबद्दल आनंद व्यक्त केला.
दरम्यान, ‘तारिणी’ मालिकेच्या कथानकात तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राइम युनिटचे सदस्य असून ते आपली ओळख लपवून काम करत आहेत. सामान्य आयुष्य जगत असताना ते गुन्हेगारीविरोधात लढा देतात. निष्पाप लोकांवर संकट आल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते मदतीला धावून जातात.
सध्या कथेत ते खांडेकर कुटुंबात नवरा-बायको म्हणून राहत आहेत. मात्र युवराजला केदार आणि तारिणीला घराबाहेर काढायचे असल्याने तो सतत त्यांच्याविरुद्ध कट-कारस्थाने रचताना दिसतो. अशातच पुढे मालिकेत नेमकं काय घडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.