‘जुन ते सोन म्हणतं’ रांजणगाव येथील फंड कुटुंबाने बनवली दिड लाख रुपयांची बैलगाडी

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात गेल्या 20 ते 22 वर्षांपुर्वी औद्योगिक वसाहत आली. त्यामुळे सरकारने औद्योगिक वसाहतीसाठी आसपासच्या गावातील शेतजमिनी संपादित केल्या. त्यामुळे शेतीत राबणारे शेतकरी रांजणगाव MIDC त कामाला जाऊ लागले. परंतु आजही “जुनं ते सोनं” या म्हणीप्रमाणे आपली संस्कृती जपत अष्टविनायक गणपती पैकी महत्वाचे स्थान असलेल्या रांजणगाव गणपती येथील शेतकरी कुटुंबातील माणिक बबनराव फंड यांनी नुकतीच दिड लाख रुपये खर्च करत नवीन बैलगाडी बनवुन घेतली.

रांजणगाव गणपती येथील कारभारी कै. बबनराव गोपाळा फंड यांच्या परिवारात पाच चुलते आणि अठरा भाऊ यांचं एकत्र कुटुंब असताना ३५० एकर शेती, १८ बैल, १३ गाई, ७ म्हशी होत्या. फंड कुटुंबाने कष्ट करुन ६ पायली शेतीचा पेरा हा ६ पोत्यावर नेला आणि प्रपंच वाढवला. नंतर काही दिवसांनी हे कुटुंब विभक्त झाले. तसेच MIDC आल्याने शेतीकडील कल कमी होऊनशेतकरी MIDC कडे वळाला पण कोरोना सारख्या महामारीमुळे पुन्हा एकदा शेतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात आले. त्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा पुन्हा शेतीकडे वळवला.

त्यामुळेच आपली संस्कृती जपण्यासाठी रांजणगाव गणपती येथील माणिक बबनराव फंड अंदाजे दिड लाख रुपये खर्च करत पारंपरिक पद्धतीने बैलगाडी बनवुन घेतली आहे. येथील फंड कटुंबातील दत्तात्रय फंड, बाळासाहेब फंड आणि स्वतः माणिक फंड शेती करतात. त्यांचे मोठे बंधू शिवाजीराव फंड हे शिक्षक आहेत. त्यांच्या मुलांचा MIDC मध्ये व्यवसाय आहे. तरीही शेतकरी असल्याने या सर्व कुटुंबाची मातीशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे आमच्या मुलांनी आम्हाला दिवाळी भेट म्हणून बैलगाडी बनवली त्यामुळे आम्हाला समाधान वाटले अशी प्रतिक्रिया माणिक फंड यांनी यावेळी बोलताना दिली. त्यांच्या मुलांनाही शेतीची आवड असुन त्यांच्याकडे सध्या ४ बैल, २ गावरान गाई, १ घोडा आहे.