शिक्रापुरात ग्रामपंचायतच्या निषेधार्थ समाज मंदिराला लागले अचानक टाळे…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिराजवळ समाज बांधवांसाठी सुरु असलेले स्वच्छता गृहाचे काम जवळील शिक्षण संस्थेच्या सांगण्यावरुन ग्रामपंचायतने बंद केल्याच्या निषेधार्थ समाज बांधवांनी समाज मंदिराच्या मुख्य गेट ला टाळे ठोकून ग्रामपंचायतचा निषेध नोंदविला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिर परिसरात स्वच्छता गृह बांधण्याची मागणी नागरिकांनी केलेली असताना ग्रामपंचायत च्या वतीने सदर ठिकाणी 15 वित्त आयोगाच्या निधीतून कामाला सुरुवात करण्यात आलेली असताना समाज मंदिराचे शेजारी काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरुपात जागा देण्यात आलेल्या शिक्षण संस्थेने ग्रामपंचायतला पत्र देऊन सदर काम बंद करण्याची विनंती केली.

ग्रामपंचायतने सदर काम बंद केले असल्याने अशोक सोनवणे, आनंदा सोनवणे, नथू सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, सुनील सोनवणे, निलेश सोनवणे, राहुल लोंढे, सुरेश भोसले, अनिल पवार, स्वाती सोनवणे, सोनाली सोनवणे, निर्मला सोनवणे, मंदा सोनवणे, कविता सोनवणे, अर्चना सोनवणे, श्वेता सोनवणे, राधा पवार यांसह आदींनी समाज मंदिराचे गेटला टाळे ठोकून ग्रामपंचायतच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.

दरम्यान येथील शिक्षण संस्थेला काही वर्षांपुरती तात्पुरत्या स्वरुपात शाळेला जागा दिलेली असताना सध्या राजकीय बळाचा वापर करुन संस्था हलवली जात नसून समाज मंदिराच्या परिसरातील जागा बळकावण्याचा डाव शिक्षण संस्थेचा असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला असून ग्रामपंचायतने तातडीने काम सुरु करुन पूर्ण करण्याची मागणी देखील येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सदर ठिकाणी सुरु असलेल्या कामाबाबत येथील शाळेने ग्रापंचायतला पत्र दिले असल्याने सरपंच यांच्या आदेशानुसार काम बंद करण्यात आलेले असून शिक्षण संस्था व ग्रामस्थ या दोन्ही बाजूचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाला पाठवून पुढील निर्णय घेऊ असे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.