शिरुरमध्ये आढळली पावाच्या लादीत घुशीची लेंडी ; नागरिकांमध्ये संतापाची लाट

मुख्य बातम्या शिरूर तालुका

अन्न प्रशासन विभाग दाखवा आणि बक्षीस मिळवा असे म्हणण्याची नागरिकांवर वेळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर शहरालगत रामलिंग रोडवर असणाऱ्या सिरवी बंधू मिठाईवाले या स्वीटहोम बेकरीतून विकत घेतलेल्या पावामध्ये चक्क घुशीची लेंडी आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० जुलै रोजी सतीष तागड यांच्या बाबतीत घडली. त्यांनी दोन पावाच्या लाद्या विकत घेतल्या असता त्यामध्ये एका लादीत चक्क घुशीची घाणेरडी मोठी लेंडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर सतीष तागड यांनी सिरवी बंधू बेकरीत धाव घेत याबाबत इतर ग्राहकांसमोर हा प्रकार उघड केला. जर हा पाव कुण्या लहान मुलांनी किंवा आजारी व्यक्तींनी खाल्ला असता, तर त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असता, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षा व औषध प्रशासन (FDA) विभागावर देखील प्रचंड टीका केली जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, “शिरूर शहर व तालुक्यातील बेकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून, अन्न प्रशासन यंत्रणा केवळ फाईलांपुरती सक्रिय आहे.”

शिरूर आणि परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये शिळे, खराब व बिनधास्त साठवलेले पदार्थ खुलेआम ग्राहकांना दिले जात आहेत. अन्न व सुरक्षा विभागाचे कोणतेही नियमित निरीक्षण नसल्याने असे प्रकार सर्रास घडतात. अन्न प्रशासन आधिकार “दाखवा आणि बक्षीस मिळवा” ही धोरणं उपहासात्मक ठरत असून, नागरिकांचा थेट जीव धोक्यात घालणाऱ्या व्यवसायांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे.

या गंभीर प्रकरणावरून संतप्त नागरिकांनी तातडीने संबंधित बेकरीवर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण शिरूर तालुक्यातील हॉटेल्स, बेकऱ्यांचे अन्न सुरक्षा तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शहरात याप्रकारे मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या खाद्य व्यावसायिकांवर जर वेळेत व कठोर कारवाई झाली नाही, तर नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही संकेत मिळाले आहेत. प्रशासनाने तातडीने अन्न सुरक्षा यंत्रणा सक्रीय करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

ही घटना शिरूरसारख्या वाढत्या शहरात अन्न सुरक्षेचा ढासळलेला चेहरा दाखवते, आणि प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवते. आता तालुका प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभाग यातून काय धडा घेते हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. या बेकरी, हॉटेल्स बरोबर शिरूर तालुक्यात दुधाची भेसळ मोठ्या प्रमाणावर होत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असून यावर अंध प्रशासन विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी आता शिरूर तालुक्यातील जनतेकडून होत आहे.