सविंदणे ग्रामपंचायतीत महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा, मालुबाई मिंडे उपसरपंचपदी बिनविरोध निवड

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे ग्रामपंचायतीत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत महिलांनी पुन्हा एकदा नेतृत्वाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी उपसरपंच गोरक्ष लंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी मालुबाई नामदेव मिंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेत सरपंच मनीषा नरवडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी आरती गव्हाणे यांनी प्रभावी काम पाहिले. विशेष म्हणजे, सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी ही तिन्ही महत्वाची पदे महिलांच्या हाती गेल्याने सविंदणे ग्रामपंचायत महिला नेतृत्वाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

गावकऱ्यांमध्ये या निवडीबद्दल प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा गाठल्याचा अभिमान नागरिक व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायतीतील महिला सदस्य व ग्रामस्थांनी मालुबाई मिंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मालुबाई मिंडे यांच्या निवडीबद्दल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, भाजी आमदार पोपटराव गावडे, माजी पं.स. सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी दूरध्वनीद्वारे व संदेशाद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. “गावातील विकासकामांना नवे बळ मिळेल आणि महिलांच्या नेतृत्वातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल” असा विश्वास या मान्यवरांनी व्यक्त केला.

सविंदणे ग्रामपंचायतीत महिलांच्या हाती सत्ता आल्याने गावात नवा आदर्श निर्माण झाला आहे. गावातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला-बालविकास यांसह मूलभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. महिला सदस्यांच्या नेतृत्वामुळे गावाच्या प्रगतीत सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीतील नागरिकांनी मांडली.

गावातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “आजवर पुरुषवर्गाचे नेतृत्व आपण पाहिले, मात्र आता स्त्रियांच्या हातात सत्ता येत असल्याने गावच्या विकासाला नवा चेहरा मिळेल.” निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याने गावात एकी व सलोखा टिकून असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.