sambhajiraje-vidyalay-jategaon

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य लोकशाहीचा खरा दिपस्तंभ: पवार

शिरूर तालुका

शिक्रापूरः ‘राज्यात प्राथमिक सक्तीचे प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण कौशल्य शिकविणाऱ्या शाळा तसेच जातीभेदाविरुद्ध लढा, राधा नगरी धरणाची उभारणी, शेती, उद्योग, सहकार क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे शाहू महाराजांचे कार्य आधुनिक लोकशाहीला दिपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहे. शेती क्षेत्रात आधुनिकरण व संशोधनाला पाठिंबा देणारे महानायक म्हणून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे कार्य समाजाला संस्मरणीय आहे,’ असे विचार शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

मौजे जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष पूर्तता कार्यक्रमात पवार बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक साहेबराव उमाप, जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके, प्राचार्य रामदास थिटे, प्राध्यापक संतोष डफळ, गणेश बांगर, कांतीलाल धुमाळ, शंकर भुजबळ, विजय वरपे, विद्यार्थी, प्राध्यापक व पालक उपस्थित होते.

प्रास्तविक भाषणात प्राचार्य थिटे म्हणाले, ‘लोकशाहीच्या जडणघडणीत राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण, कलेला दिलेला आश्रय, मल्लविद्या व मागासलेल्या समाजास विकासाच्या प्रवाहात आणणेकामी केलेले कार्य समाजास सदैव प्रेरणादायी आहे.’

याप्रसंगी शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ शालेय निकालाचे वाटप करणेत आले. प्राध्यापक मनोहर भिसे, शंकर भुजबळ, गणेश बांगर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश बांगर यांनी तर आभार संतोष डफळ यांनी मानले.