मोबाईल मुळे मुलांचे जुने मैदानी खेळ कालबाह्य

शिरूर तालुका

मैदानी खेळ नसल्याने मुलांच्या शारीरिक वाढीत अडचणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या मोबाईलचे युग असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आढळून येणारा मोबाईल झाला, तर मोबाईल मानवी जीवनातील एक आवश्यक घटक बनला आहे. मात्र युवक वर्ग व लहान लहान मुले मोबाईलमध्ये गुंतली गेल्यामुळे मुलांचे सुट्ट्यांच्या काळातील सर्व जुने मैदानी खेळ कालबाह्य होत चालले असून पुढील काळातील मुलांना खेळ म्हणजे काय हे सांगावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

शालेय जीवनात मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर आता आपल्याला भरपूर खेळ खेळता येणार या आनंदाने मुले बागडत असत शाळेला सुट्ट्या लागताच अनेक ठिकाणी मुले क्रिकेट, विट्टीदांडू, गोट्या, लिंगोरचा, आपारापी, लपाछपी, सूरपारंब्या, कब्बडी, खो खो, झोके, पतंग उडविणे, भिंगरी खेळणे यांसह आदी प्रकारचे पारंपारिक प्रकारचे खेळ खेळत तसेच दुपारच्या सुमारास पोहण्याचा आनंद घेत असत तर प्रत्येक ठिकाणी लहान लहान मुले कोणत्याही प्रकारचे खेळ खेळताना दिसून येत होते. त्यावेळी मुलांना खेळण्याच्या गडबडीमध्ये दिवसभराचा वेळ देखील कमी पडत होता आणि खेळांमुळे भूक देखील जास्त लागल्याने मुले वेळेवर पोटभर जेवण करत असत आणि मैदानी खेळांमुळे मुलांमध्ये शारीरिक व्यायाम आपोआप घडत असल्याने मुले देखील शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहत होते.

तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुले रानामध्ये जाऊन कच्च्या कैऱ्या, चिंचा गोळा करून आणण्याकडे देखील आकर्षित होत होते त्यामुळे मुलांना देखील झाडांना कधी कैऱ्या लागतील असे वेध लागलेले होते. परंतु सध्याच्या मोबाईलच्या काळामध्ये सर्व मुले मोबाईल मधील विविध प्रकारच्या गेम मध्ये रमून गेलेली असल्यामुळे कोठेही मुले कोणते खेळ खेळताना दिसून येत नाहीत सर्वत्र मैदाने मोकळी पडलेली आहेत, झाडांवरील कैऱ्या, चिंचा देखील झाडांवर राहिलेल्या आहेत. मुले घरातच मोबाईल मध्ये गेम खेळताना दिसून येत आहेत.

सध्याच्या मुलांना जुन्या खेळांबाबत कोणतीही माहिती नसून सर्व खेळ मुलांना समजावून सांगावे लागत आहेत त्यामुळे पुढील काळामध्ये मुलांना हे खेळ समजू शकतील का असा प्रश्न निर्माण झाला असून जुने सर्व मैदानी खेळ हे कालबाह्य होत चाललेले असल्याचे दिसून यते आहे.

मुलांना मैदानी खेळांची आवश्यकता; प्रकाश घोलप (क्रीडा प्रशिक्षक)

लहान मुलांसाठी मोबाईलवर असलेल्या गेम मुले मुलांचा बौद्धिक विकास होतो परंतु शारीरिक विकास होत नाही व मुले कमजोर होतात, मात्र विविध मैदानी खेळांमुळे मुलांचा शारीरिक विकास होऊन मुले तंदुरुस्त राहतात त्याचा पुढील काळामध्ये शरीरासाठी उपयोग होतो त्यामुळे मुलांना मैदानी खेळांची आवश्यकता असल्याचे मत क्रीडा प्रशिक्षक प्रकाश घोलप यांनी व्यक्त केले.