कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु वाहतुकीचा गंभीर प्रकार समोर आला असून रांजणगाव MIDC पोलिसांनी कारेगाव येथील यश इन चौक परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ४ लाख ४९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा दारु वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस कारेगाव गावच्या हद्दीत यशइन चौक येथे वाहतूक नियमन करत होते. यावेळी संशयास्पद अवस्थेत असलेली वीन्टो कार क्र (एम एच 12 आर वाय 7510) थांबवून तपासणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या कारची झडती घेतली असता विविध मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यामध्ये
बेलेंटाईन स्कॉच व्हिस्की (750 मि.ली.) 5 बाटल्या ( किंमत 12 हजार)
किंगफिशर बिअर (500 मि.ली.) 24 टिन (किंमत 4,200)
बडवायझर मॅग्नम (500 मि.ली) तब्बल 126 टिन (किमंत 25,200)
ब्रीझर बिअर (275 मि.ली.) 40 बाटल्या (किंमत 6 हजार)
स्मिरनॉफ व्होडका (750 मि.ली.) 1 बाटली (किंमत 1,700) असा दारुचा एकूण 49,530 किमतीचा मुद्देमाल असून, यासोबत वीन्टो कार (किंमत अंदाजे 4 लाख) सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
यामध्ये शब्बीर उस्मान तांबोळी (वय 38) रा. विकासनगर कॉलनी, लोहगाव, प्रवीण उत्तम कंठ (वय 49) रा. कोंढवा, करण राजू चांदणे (वय 30) रा. येरवडा, गांधीनगर (सर्व ता. हवेली, जि. पुणे) या तीन आरोपीना अटक करण्यात आले असुन या तिघांकडे दारु वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस कॉन्स्टेबल सुरज दत्तात्रय वळेकर यांच्या फिर्यादीवरुन करण्यात आली असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार विनोद मोरे हे करत आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्य कुठून आणि कुणासाठी नेले जात होते…? यामागे मोठे रॅकेट आहे का…? याचा रांजणगाव पोलीस कसुन तपास करत असून, दारू तस्करीचे धागेदोरे आणखी खोलवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात रांजणगाव MIDC पोलिसांची हि कारवाई म्हणजे दारु तस्करांसाठी स्पष्ट इशारा मानली जात आहे.