पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळी हाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला थोडी-थोडकी नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. कालांतराने या खड्ड्यांचे रांजणाकार खळग्यांत रूपांतर होते.
वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वाहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात.
निघोजला जाण्यास दोन रस्ते. शिरूरच्या पुढं घोडनदीचा पूल ओलांडून गव्हाणवाडीच्या फाट्यावरून डावीकडं राळेगण थेरपाळ, जवळा असे छोटे छोटे पल्ले गाठून निघोज गावात पोचता येते. दुसरा मार्ग म्हणजे शिक्रापूर-गणेगाव खालसा-वाघाळे-मलठण-टाकळी हाजी मार्गे निघोज. शिरूरहून गेलात, की आधी आपण निघोज गावात पोचतो. तिथं वेशीजवळून रस्ता कुंडाकडं जातो. निघोजमधील मळगंगा देवी म्हणजे पंचक्रोशीतल्या कुटुंबांची कुलदेवता. गावातील मंदिरापासून अंदाजे दोन-अडीच किलोमीटरवर जगप्रसिद्ध रांजणखळगी आहेत.
कुंडांच्या शेजारीच नदीवर झुलता पूल आहे. त्यावरून रांजणखळग्यांची अथांग खोली अनुभवता येते. शेजारचंच मळगंगेचं, म्हणजेच कुंडमाऊलीचं नदीकाठी असलेले मंदिर आहे. नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अशा भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब आहेत. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत. कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो. काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रज्ञ भेटी देतात.
रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे. या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे वर्षेभर पर्यटक भेटी देतात.
कुकडी नदीच्या मध्यात खूप खोल सात कुंड आहेत. ते किती खोल आहेत याचा कुणालाच थांग लागलेला नाही म्हणतात. अनेक तज्ज्ञ येऊन गेले, पण कुंडाची खोली कुणालाच मोजता आली नाही. साती आसरांचे ते सात कुंड आहेत असे स्थानिक नागरिक सांगतात.