द्रुतगती चलन भरूनही मोजण्या रखडल्या; शिरूरमधील शेतकऱ्यांचा संताप, बावनकुळे यांना सवाल

मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): द्रुतगती चलन भरूनही महिनाभरात मोजणी पूर्ण होणे अपेक्षित असताना शिरूर तालुक्यात सहा-सहा महिने उलटूनही मोजण्या होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सवाल उपस्थित केला आहे.

नियमानुसार द्रुतगती चलनाच्या प्रकरणात एका महिन्यात, तर नियमित चलनासाठी तीन महिन्यांत मोजणी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात शिरूर तालुक्यात वर्ष उलटूनही अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.

“द्रुतगती चलन भरूनही वेळेत काम होत नसेल, तर या योजनेचा उपयोग काय?” असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव आहे का, असा सवालही नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, काही निवडक प्रकरणांमध्ये मोजणीच्या तारखा बदलून तातडीने कामे केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या संशयास्पद बाबींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

पूर्वीप्रमाणे मोजणी प्रक्रियेत बदल करण्याचे अधिकार तालुका स्तरावर देण्यात आल्यास कामे अधिक जलद होऊ शकतात, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. सध्या निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण झाल्याने विलंब वाढत असल्याची टीका होत आहे.

शिरूर तालुक्यातील प्रलंबित मोजण्या तातडीने पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तेजस यादव यांनी दिला आहे.एकूणच, शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यात नाराजीचा सूर तीव्र होत असून, यावर तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत