कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

क्राईम शिरूर तालुका

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा परिसरातील आश्रमशाळेत सेंट्रिंगचे काम सुरू असताना मोबाईलवर व्हिडिओ काढल्याच्या कारणावरून कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. तसेच मध्यस्थीला आलेल्या महिलेवर मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पलटू निषाद (वय २३, रा. सध्या कामाठीपुरा, शिरूर) हे आश्रमशाळेत मजुरीचे काम करीत होते. मंगळवारी (दि. २९) रात्री आठच्या सुमारास आश्रमशाळेच्या गेटवर काही कामगारांना आरोपी भूषण अनिल मुत्याल हा मारहाण करत होता. ही घटना मोबाईलमध्ये चित्रित केल्याचा राग आल्याने भूषण मुत्याल याने विजय निषाद यांच्यावर हाताने तसेच लोखंडी रॉडने हल्ला केला.

या वेळी फिर्यादीची पत्नी व इंद्रकुमार निषाद हे सोडविण्यासाठी पुढे आले असता, आरोपीने महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली व तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपीचे वडील, पत्नी, बहीण तसेच दोन अनोळखी इसम घटनास्थळी येऊन त्यांनीही इंद्रकुमार निषाद यांना मारहाण केली.

दरम्यान, ठेकेदार बंडगर यांनाही “येथे काम कसे करता, कामगार कसे राहतात ते पाहतो” अशी धमकी देत शिवीगाळ करण्यात आल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी भूषण अनिल मुत्याल, अनिल मुत्याल (पूर्ण नाव अज्ञात), त्याची बहीण व पत्नी (नावे अज्ञात) तसेच दोन अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आगलावे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत