बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या रास्ता रोको प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता. शिरुर) येथे १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जनतेच्या रोष अनावर झाला. या घटनेच्या निषेधार्थ दि ३ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या व नागरीकांच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावरील नंदी चौक, भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले होते. आंदोलनात शेकडो ग्रामस्थ, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. प्रशासनाकडून आंदोलन थांबविण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले असतानाही आंदोलकांनी “पालकमंत्री व वनमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार” असा ठाम पवित्रा घेतला होता. परिणामी, हे रास्ता रोको आंदोलन तब्बल २२ तास चालले.

या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल अजित रघुनाथ पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असुन, १) देवदत्त जयवंतराव निकम रा. नागापूर यांचे नेतृत्वाखाली २) अरुण गोविंदराव गिरे रा. मेंगडेवाडी, ३) नरेश सिताराम ढोमे रा. पिंपरखेड, ४) शरद रोहीदास बोंबे रा. पिंपरखेड, ५) सचिन बाळू बोंबे रा. पिंपरखेड, ६) भोलानाथ लक्ष्मण पडवळ रा. सविंदणे, ७) किरण शांताराम ढोबळे रा. पारगाव, ८) दिलीप नथू वाळुंज रा. लोणी, ९) रवी जनार्दन वळसे रा. निरगुडसर, १०) पुजा निलेश वळसे रा.निरगुडसर, ११) निलेश भिवसेन वळसे रा.निरगुडसर, १२) सुरेश सुरेश लक्ष्मण भोर रा.अवसरी खुर्द, भोरवाडी, १३) सुभाष पोकळे रा. कवठे येमाई, १४) दामू अण्णा घोडे रा. टाकळी हाजी, १५) विकास विलास गायकवाड रा.पोंदेवाडी, १६) कुणाल शिवाजी बाणखेले रा. मंचर, १७) विशाल जालिंदर वाबळे रा. खडकी, १८) धोडिंभाउ भोर रा. वळती, १९) संपत बाळासाहेब बाणखेले, २०) रमेश शिवाजी येवले रा. गंगापूर खुर्द २१) नित्यानंद भिमसेन/भिवसेन येवले रा. गंगापुर खुर्द, २२) दत्तात्रय दशरथ गांजाळे रा. मंचर, २३) जयेश भालेराव रा. मंचर, २४) प्रभाकर गोपाळा बांगर रा. मंचर, २५) वनाजी बजरंग बांगर रा. पिंपळगाव, २६) अजित शरद चव्हाण रा. अवसरी बुद्रुक, २७) दिपक गंगाराम पोखरकर, २८) भाउसाहेब सांवत रा. पारगाव तर्फे खेड, २९) राजेंद्र विठठल दाभाडे रा. पिंपरखेड, ३०) विकास देवराम वरे, रा. पिंपरखेड, ३१) सौरभ उर्फ वैभव संभाजी पोखरकर, रा. वडगाव काशिंबेग तसेच २०० ते २५० कार्यकर्ते व पिंपरखेडचे ग्रामस्थ यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवुन हायवेवरील वाहने अडवून लोकसेवक यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता लोकसेवकाचे सार्वजनिक कार्य पार पाडण्यास अटकाव करुन बेकायदेशीर रास्ता रोको आंदोलन केल्याने त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांच्या अहवालानुसार आंदोलनकर्त्यांनी महामार्गावरील दोन्ही लेन बंद करुन वाहतुक अडवली. लोकसेवकांना आदेशांचे उल्लंघन करुन सार्वजनिक कार्यात अडथळा आणला. या प्रकरणामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “बिबट्याच्या हल्ल्यामुळे वारंवार जीवितहानी होत असताना शासन प्रशासन निष्क्रिय आहे; उलट पीडितांच्या आवाजाला गुन्हेगारीचा ठपका लावला जात आहे.”

तसेच स्थानिक नागरीक व कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, सरकार व वन विभागाने बिबट्या बंदोबस्तात अपयश मिळवले असुन, निष्क्रियतेचा निषेध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून दडपशाही सुरू केली आहे. “हे आंदोलन जनतेच्या भावनांचे प्रतीक होते. प्रशासन व मंत्र्यांनी घटनास्थळी येऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होती. गुन्हा दाखल करून सरकारने अन्याय केला आहे. या घटनेमुळे आंबेगाव-शिरुर परिसरात राजकीय वातावरण चिघळण्याची चिन्हे आहेत. “जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न बाजूला ठेवून शासनाने आंदोलनकर्त्यांना आरोपी बनवले”. आगामी काळात या प्रकरणाचे परिणाम स्थानिक राजकारणावरही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.