कोरेगाव भीमात विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लोटला लाखोंचा भीमसागर

मुख्य बातम्या

प्रशासनाच्या नियोजनाने कार्यक्रम शांततेत, सर्वपक्षीयांची हजेरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखात जय भीमचा नारा होता. तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करीत होते. कोरोनाच्या सावटानंतर याठिकाणी नाताळ व रवीवार असल्याने आज लाखोंचा जनसमुदाय मानवंदना व अभिवादन करण्यासाठी येत असताना जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्या नियोजनामुळे शौर्यदिन मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पडला.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात अत्यंत उत्साहपुर्वक वातावरण प्रशासनाने गेले दोन महिने सातत्याने गाव बैठका घेत सामाजीक सलोखा निर्माण केल्याने मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांमध्ये मोठी उर्जा पाहण्यास मिळत होती. राज्यासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, हरियाना, कर्नाटक सह आंध्र प्रदेशातुन मोठ्याप्रमाणावर आंबेडकरी समाज विजय स्तंभाजवळ एकवटला होता.

भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लीकन सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौध्द महासंघ, दलीत पँथर यासह अनेक सामाजीक संघटनांच्यावतीने मानवंदना देण्यात येत असताना आंबेडकरी चळवळीची आणि सामाजीक विषमतेवर सडेतोड भाष्य करणारे गित याठिकाणी साजरी केली जात होती. या सोबतच मराठवाडा, विदर्भातुन आलेले कलाकार रस्त्याच्या कडेला, झाडाखाली सावलीत बसुन प्रबोधनात्मक गाणी सादर करित होती. येथे नागरिकांना विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मुख्य रस्त्यापासुन एका रांगेत सोडण्यात येत होते. कडाक्याची थंडी असताना सुध्दा रात्रीपासुनच भीमसैनिकांनी गर्दि केली होती.

मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये वयस्कर, तरुणांसह महिला वर्ग व लहान मुलांची संख्या मोठी होती. भरदुपारच्या उन्हातही भीमसैनिक आणि नागरिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी रांगेत उभे होते. पोलीसांनी अभिवादन स्थळावर जाण्यासाठी 4 बाजुंनी रांगा करुन बाहेर पडण्यासाठी 5 रांगा करुनही मोठ्या प्रमाणात गर्दि असल्याने व्हीआयपी गेटमधूनही अनुयायांना सोडण्यात आले होते.

कोरेगाव भीमा येथे शनिवारी रात्रीपासुन सुरु असलेल्या गर्दिचा ओघ रविवारी पहाटेपासुनच वाढायला सुरुवात झाली होती. यात महाराष्ट्रासह विविध राज्यातुन लोक येत होते. कोरेगाव भीमा पासून पुणे नगर रस्त्याने रांगा लागल्या होत्या. तरुण कार्यकर्त्यांसह स्त्री पुरषांची लक्षणीय गर्दी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्याप्रमाणात गर्दी वाढलू होती. अंदाजे १४ ते १५ लाख लोक अभिवादन साठी याठिकाणी आले होते.

दिवसभरात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त बी. ए. सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगीता डावखरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, भीमराज आंबेडकर, भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, लातूरचे खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार प्रकाश गजभिये, जयदेव गायकवाड, बापू पठारे, जोगेंद्र कावडे, दलीत पँथरचे अध्यक्ष दिपक केदार यांसह आदींनी सदर ठिकाणी अभिवादन केले असून प्रशासनाच्या नियोजनाने कार्यक्रम शांततेत पार पडला आहे.