शिक्रापुर (तेजस फडके) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात आज शनिवार (दि ३०) रोजी सायंकाळी थरारक घटना घडली. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलिस पथक अटक करायचा प्रयत्न असताना संशयित आरोपीने अचानक चाकू काढून पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला असुन त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आरोपीचे नाव लखन पोपट भोसले (रा. वडगाव पुसावले, ता. सातारा) असे असुन त्याच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे व पोलीस हवालदार सुजित भोसले हे शिक्रापुरात पथकासह दाखल झाले होते.
सायंकाळी ७:३० च्या सुमारास पोलिसांनी लखन भोसलेला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने अचानक सुजित भोसले यांच्यावर चाकुने वार केला. या धक्कादायक प्रकारामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये लखन गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
View this post on Instagram