न्हावरा फाटा ते चौफुला रस्त्यावर रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरूर-चौफुला रस्त्यावर न्हावरा फाटा ते कर्डे या दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सुमारे ६० ते ७० वर्षे जुन्या वृक्षांची सध्या कत्तल सुरू असल्यामुळे वृक्ष प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही झाडे तोडताना शासनाने ठरवून दिलेले निकष पाळले जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरीकांनी केली आहे. याबाबत वनमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 

न्हावरा फाटा ते कर्डे दरम्यान एकूण २८० मोठमोठी झाडे आहेत. त्यापैकी १२० झाडांचे पुर्नरोपण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात पुर्नरोपण करण्यासाठी योग्य असलेली झाडेच प्राधान्याने कापली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या भागात सध्या रांजणगाव एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्यातील औद्योगिक वसाहतीचे काम सुरू आहे. या औद्योगिक वसाहतीपासून पुणे-नगर रस्त्याला जोडणाऱ्या न्हावरा फाट्यापर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दुसरीकडे वाहनांची संख्या वाढल्याने रस्ता ही अपुरा पडत आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या या रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या ६० ते ७० वर्षे जुन्या वड, लिंब यासह मोठमोठ्या वृक्षांची बेमालूमपणे कत्तल सुरु आहे.

 

यापूर्वी कर्डे-न्हावरा या रस्त्यावर विशेषत: वडाची फार मोठमोठी जुनी झाडे होती. यामुळे या भागात उन्हाळ्यात गारवा, थंड वातावरण, सावली, पक्षांचा किलबिलाट असे पर्जन्य आणि पर्यावरणपूरक वातावरण होते; परंतु त्यावेळी या सर्व झाडांची कत्तल करण्यात आली. या मार्गावर सरकारच्या नियमाप्रमाणे वृक्ष लागवड करणे बंधनकारक असताना आजतागायत ती झालेली नाही. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड असणे अत्यंत गरजेचे असते परंतू या नियमाला बगल देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्डे-न्हावरा मार्ग उजाड आणि भकास दिसत आहे. अशा या भागात वृक्षांची पुर्नलागवड करून त्यांना पाणी देऊन ती जगविण्याची तजवीज करण्यात यावी, अशी मागणी ही या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.

 

कर्डे-न्हावरा मार्गावर तीन वर्षांपूर्वी अष्टविनायक मार्गासाठी रस्ता रूंदीकरण काम आणि नवीन रस्ता करताना शेकडो झाडे तोडण्यात आली. नियमानुसार झाडे तोडल्यास त्याची लागवड करणे बंधनकारक असतानाही ते निकष पाळले न गेल्याने हा रस्ता आजही उजाड आहे. पूर्वीचा हा अनुभव असल्यामुळे ग्रामस्थ आता सतर्क झाले आहेत.

 

एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता मागील काही वर्षांपासून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. पण त्याची फलश्रूती होत नसल्याचेच दिसून येत आहे. एकीकडे वृक्ष लागवड करायची आणि दुसरीकडे जुनी झाडे विकासाच्या नावावर सर्रास कापायची, असा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. पुणे ते नगर मार्गावर काही वर्षांपूर्वी अशीच जुन्या महाकाय अशा शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्यातून पुर्नलागवड करण्यात आलेली किती झाडे जगली हा संशोधनाचा विषय ठरेल. आता या मार्गावरही रस्त्याच्या दुतर्फा किती वृक्ष लावले जातील की त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, हे वेळच सांगणार आहे. असे असले तरी वृक्षतोडीमुळे सध्यातरी रस्ते भकास झाले असून पर्यावरणाची हानी होत आहे. रस्ता रूंदीकरणासाठी ही लाखमोलाची झाडे कापली जात आहेत. यामुळे सर्वत्र सिमेंटचे जंगल निर्माण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता प्रत्येक मार्गावर वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.

 

पुर्नयोग्य झाडांचे फेरसर्वेक्षण व्हावे !

न्हावरा फाटा ते कर्डे या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु आहे. संपूर्ण शिरूर तालुक्यात सध्या याच ६ किलोमीटर मार्गावर असे जुने वृक्ष उरले आहेत रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली त्यावरही आता कु-हाड चालविली जात आहे. किड लागलेली व वठलेली झाडे मागे ठेऊन चांगली मोठी बहरलेली आणि पुर्नलागवड योग्य झाडे प्रथम का कापण्यात येत आहे, हे आम्हा ग्रामस्थांना न उलगडणारे कोडे आहे. याबाबत आम्ही संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली असता ठेकेदार एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतो तर एमआडीसी अधिकारी वनखात्याकडे बोट दाखवतात दुसरीकडे वनखाते अधिकारी फोन उचलत नाहीत. अशा परिस्थितीत झाडांची कत्तल तातडीने थांबवून पर्नलागवड योग्य झाडांचे आमच्या उपस्थितीत फेर सर्वेक्षण झाले पाहीजे, अशी आमची मागणी आहे.

 

अमोल घायतडक

सामाजिक कार्यकर्ते, करडे