रांजणगाव येथे मुक्तद्वार दर्शनाला लाखों भाविकांची गर्दी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकापैकी महत्वाचा गणपती असलेल्या रांजणगाव येथील महागणपती मंदिरात भाद्रपद गणेशोत्सवातील मुक्तद्वार दर्शनाचा आज दुसरा दिवस तसेच रविवार असल्यामुळे आसपासच्या गावातील लाखों भाविकांनी महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात आणि मोठया उत्साहात भाविकांनी महागणपतीच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेतले.

भाद्रपद महोत्सवाच्या द्वार याञेच्या दुसऱ्या दिवसाला सुरवात होताच पहाटे पासुनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराच्या परिसरात फुलांची केलेली आकर्षक आरास, विद्युत रोषणाई तसेच सनई चौघाड्यांचा मंजुळ स्वर तसेच मंदिरात सुरु असलेली भजनसेवा यामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असल्याचे “रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट” च्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी सांगितले

 

आज रविवार (दि 17) रोजी पहाटे ३ वाजता महागणपतीची पुजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर मंदिर मुक्तद्वार दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाद्रपद गणेशोत्सव असल्याने भाविकांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी १० वाजता महागणपतीच्या पालखीचे दक्षिणद्वार यात्रेकरिता निमगाव म्हाळुंगी गावाकडे प्रस्थान झाले. पालखीचा मान माळी आळीकडे होता.

 

यावेळी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, मुख्य विश्वस्त डॉ ओमकार देव, उपाध्यक्ष संदीप दौडकर, सचिव डॉ तुषार पाचुंदकर पाटील, उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर, सरपंच सर्जेराव खेडकर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांसह पालखीचे मानकरी माळी आळी, ग्रामस्थ व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी भाविकांच्या प्रचंड गर्दीने मंदिर व परिसर फुलून गेला होता. उद्या सोमवार (दि १८) रोजी पश्चिमद्वार यात्रेकरिता पालखी गणेगाव खालसा कडे प्रस्थान होणार असून पालखीचा मान लांडे आळीला असणार आहे.शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी आणि पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होतो.