शिरूर नगरपरिषदेत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

भूमिपुत्र प्रतिष्ठानचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयीन वेळेत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात भूमिपुत्र प्रतिष्ठानतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, अशा अधिकाऱ्यांची हजेरी व हालचाल रजिस्टरची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त यांना सादर करण्यात आले आहे.

नगरपरिषद क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकाची नियुक्ती असून, मुख्याधिकारी हे प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मात्र, प्रशासनाची जबाबदारी असतानाही विविध विभागांचे अधिकारी सातत्याने अनुपस्थित राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विविध कारणांची आड घेत ही अधिकारी मंडळी कार्यालयीन वेळात अनुपस्थित राहतात, ज्यामुळे नागरिकांच्या कामांमध्ये विलंब होत आहे.

नागरिकांना कार्यालयाचे खेटे, समाधान नाही

शहरातील अनेक नागरीक विविध प्रशासकीय कामांसाठी नगरपालिकेत येत असतात. मात्र संबंधित अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने नागरिकांना खेटे घालण्याची वेळ येते. परिणामी लोकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या नगरपरिषदेच्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनावर कुठलाही थेट जनतेचा अंकुश राहिलेला नाही. हीच संधी साधून काही अधिकारी शासकीय जबाबदाऱ्यांपासून दूर राहत असल्याचा आरोप कुटे यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर भूमिपुत्र प्रतिष्ठानने संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची सखोल चौकशी करावी, हजेरी व हालचाल रजिस्टरची छाननी करून दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा नगरपरिषद समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही सुशांत कुटे यांनी दिला आहे. या मागणीला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.