निमोणे गावात ग्रामपंचायतीचा ठराव असतानाही दारुधंद्याचा सुळसुळाट…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या निमोणे गावात सध्या हातभट्टी आणि विदेशी दारु विक्रीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. ग्रामपंचायतीने दारुबंदीचा ठराव करुनही त्याची उघडपणे पायमल्ली होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ग्रामपंचायतीने यापुर्वी दारुबंदीचा ठराव घेत संबंधित विक्रेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांना केराची टोपली दाखवत दारु विक्रेत्यांनी राजरोसपणे धंदा सुरुच ठेवला आहे. त्या ठरावाची प्रत पोलीस ठाण्यात देऊन कारवाईची मागणी करण्यात आली; परंतु ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

गायरानातून ‘सिटी सर्व्हे’पर्यंतचा प्रवास…

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही हातभट्टी विक्रेत्यांनी बाहेरगावातून येऊन प्रथम गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन धंदा सुरू केला. नंतर दारूच्या कमाईतून गावातील ‘सिटी सर्व्हेतील’ मोक्याच्या जागा जास्त दराने खरेदी करून पक्की घरे उभी केली आणि त्याच ठिकाणी हातभट्टी व विदेशी दारू विक्रीचा अड्डा निर्माण केला.

आठवडे बाजारात ‘तळीरामांची जत्रा’…

बुधवारी निमोणे येथे आठवडे बाजार भरतो. या दिवशी गावात दारू पिणाऱ्यांची अक्षरशः जत्रा भरते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. दारूच्या नशेतून होणारे वाद, अरेरावी आणि भांडणे यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

याबाबत स्थानिक रहिवासी बबन रामजी सातपुते यांनी पोलीस अधीक्षक व उपअधीक्षकांकडे लेखी तक्रार देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या राहत्या घराजवळच हातभट्टी व विदेशी दारू विक्रीचा मोठा अड्डा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच “दारूविक्रेते व तळीरामांची अरेरावी सहन करावी लागत आहे. कायद्याचा धाक उरलेला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

गुन्हे दाखल…पण कारवाई नाही…?

दारूविक्री करणाऱ्या आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. तरीही तडीपार किंवा स्थानबद्धतेसारखी कठोर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. पोलिसांची धाड पडली की आरोपी घरातील महिलांना पुढे करून पसार होतात, त्यामुळे कारवाईत अडथळे येतात, अशीही माहिती समोर येत आहे.

‘पंचतारांकित’ मालमत्ता, कागदोपत्री कारवाई…?

दारूविक्रीतून मिळालेल्या पैशातून काहींनी शिरूर शहरात मोठ्या मालमत्ता उभ्या केल्याच्या चर्चा गावात रंगल्या आहेत. उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिसांची कारवाई केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

निमोणे गावात दारूधंद्यामुळे सामाजिक वातावरण ढासळत असताना प्रशासनाने तात्काळ संयुक्त धाडसत्र राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता उघडपणे पुढे येत आहे. अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही दिला जात आहे.

याबाबत निमोणे गावचे ग्रामसेवक बाळासाहेब शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतने दारुबंदीबाबत वेळोवेळी ठराव केलेले आहेत. तसेच दारु विक्रेत्यांनी ग्रामपंचायतला दारु विक्री करणार नाही असे लेखी आश्वासन दिलेले आहे. अनेकवेळा त्यांच्यावर कारवाया सुद्धा झालेल्या आहेत. परंतु त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ चं आहे.