विद्याधाम प्रशालेतील ऐतिहासिक स्मारक उद्धस्त करणाऱ्यावर कारवाई करा

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): स्वातंत्र्यपुर्व काळातील युध्दात सामिल झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ असलेले विद्याधाम प्रशालेच्या समोरील पुरातन ऐतिहासिक स्मारक बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केल्यामुळे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष फिरोज सय्यद आणि सहयोगी संघटनांच्या वतीने तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन केली आहे.

ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी झालेल्या शिरुर मधील योद्ध्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारले होते. हे स्मारक शिरूर शहरातील विद्याधाम प्रशालेच्या प्रांगणात होते. या ब्रिटिशकालीन स्मारकाची नासधूस शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाने केलेली आहे. तरी यांमधील सहभागी दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टी आणि समविचारी सहयोगी संघटना यांच्या वतीने तक्रारी अर्ज देण्यात आला. त्यावेळी भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथा पाचर्णे, बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहर अध्यक्ष समाधान लोंढे, अशोक गुळादे आणि मनसेचे संदीप कडेकर उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासुन हे योध्यांचे स्मारक या ठिकाणी होते. त्याची कसलीही अडचण कधी कोणाला झाली नाही. एक एतेहासीक ठेवा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. या स्मारका भोवती खेळता खेळता अनेक पिढ्या मोट्या झाल्या. मात्र कुणीही या बाबत तक्रार केली नाही. मात्र एवढ्या वर्षानंतर हे स्मारक कोणाच्या इशारावरुन काढले गेले हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे असुन शासनाने याची दखल घेउन याच्या मुळाशी जाणे गरजेचे असल्याचे मत अनेक माजी विद्यार्थ्यांनी बोलताना व्यक्त केले.