शिरुर-आंबेगाव शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुखपदी गंगुबाई शेळके यांची निवड

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर–आंबेगाव तालुक्यात शिवसेनेने महिला संघटन बळकटीकरणासाठी निर्णायक पाऊल टाकले असुन, सोनेसांगवी येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका गंगुबाई हनुमंतराव शेळके यांची शिवसेना महिला आघाडी शिरुर–आंबेगाव तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या अधिष्ठानावर, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतुन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांना संघटनेच्या केंद्रस्थानी ठेवुन तळागाळात शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी सध्या अनेक कार्यकर्त्यांच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत.

सामाजिक, सहकार व ग्रामपातळीवरील अनुभवाच्या जोरावर गंगुबाई शेळके या महिला, शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे आवाज उठवतील, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण घराघरात पोहोचवून शिवसेनेचा झेंडा अधिक उंचावतील, असा ठाम विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे शिरुर-आंबेगाव तालुक्यात शिवसेना महिला आघाडीला नवे बळ मिळाले असून, आगामी राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे, तालुकाप्रमुख मल्हारी काळे, सरपंच रेखा काळे, रांजणगाव गणपतीच्या ग्रामपंचायत सदस्या अर्चना शिंदे, माजी सरपंच संभाजी डांगे, माजी उपसरपंच हनुमंतराव शेळके, सोनेसांगवी विकासोचे माजी अध्यक्ष सुरेश टाकळकर, उद्योजक बाबासाहेब थिटे, पुणे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष गणेश शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय दाते, शिवसेना शाखाध्यक्ष समीर शेळके, शिवाजी बोऱ्हाडे, बाबासाहेब धावडे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.